Loksabha Election 2024 : तिथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना दिल्लीहून बोलावणं येताच त्यांनी थेट राजधानी गाठली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काळत राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष महायुतीचाच भाग होणार असून, या माध्यमातून मनसेला लोकसभेसाठीच्या दोन जागांसाठी तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे कोणत्याही क्षणी युतीची अधिकृत घोषणा करणार असं चित्र असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय सूचक वक्तव्य करत सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनि एकत्रितपणे महायुती म्हणून काम करायचं असून, वेळप्रसंगी त्याग करण्यासाठी तयार राहा असं इशारावजा वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना खासदारांना दिला. उमेदवार कोणताही असला तरीही तो महायुतीचा उमेदवार आहे या भावनेनं त्याच्यासाठी काम करण्याचा आग्रही सूर त्यांनी आळवला. ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी घेण्यात आलेल्या एका बैठकीमध्ये ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून लोकसभा सदस्याना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, जागावाटपाच्या समीकरणावरून कोणताही दुरावा नसल्याचं म्हणत जागा वाटपापेक्षाही एनडीएच्या खात्यात 400 जागा कशा येतील याकडेच लक्ष द्यावं, राज्यातील 45 जागांवर लक्ष केंद्रीत करावं अशाही सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांच्यामार्फत मिळाली.
शिवसेना खासदारांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीमध्ये शेवाळेंसह राजेंद्र गावित, भावना गवळी, श्रीरंग बारणे, संजय मंडलिक या पदाधिकाऱ्यांचीही हजेरी पाहायला मिळाली. दरम्यान, सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया पाहया या गटातील नेतेमंडळींनीही राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे या पक्षासोबत काम करण्यासाठीची सकारात्मक तयारी दाखवली आहे. तेव्हा आता या साऱ्याची अधिकृत घोषणा केव्हा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.