मुंबई : कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीसिद्धिविनायकाचा भव्य रथयात्रा सोहळा माघ उत्सवानिमित्त उद्या रविवारी आयोजित करण्यात आला आहे.
या रथयात्रेत महाराष्ट्रातील लोककला आणि परंपरेचे दर्शन घडणार असून श्री गजानन.. जय गजानन.. गजराने अवघे दादर, प्रभादेवी दुमदुमून जाणार आहे.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. १८ जानेवारीपासून सुरू झालेला हा उत्सव २४ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
रविवारी २१ जानेवारी रोजी सिद्धिविनायक भक्तांच्या भेटीला येणार असून यंदाचा रथोत्सव आगळावेगळा असा ठरणार आहे. सायंकाळी ४ वाजता ही रथयात्रा गणपती मंदिरातून निघणार आहे.
श्री सिद्धिविनायक रथ यात्रेमुळे दादर-प्रभादेवी परिसरातील वाहतूक सायंकाळी ४ वाजेपासून अन्य मार्गांवर वळविण्यात आली आहे.
नागरिकांनी रथ यात्रेवेळी पुढील मार्गावरून शक्यतो प्रवास टाळावा, याची नोंद घ्यावी.
श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिरापासून निघणारी रथयात्रा आगर बाजार, पोर्तुगीज चर्च, शंकर घाणेकर मार्ग, आप्पासाहेब मराठी मार्ग ते पुन्हा सिद्धिविनायक मंदिर अशी असेल. या रथयात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आदेश बांदेकर यांनी केले आहे.
श्रीसिद्धिविनायकाच्या रथयात्रेत महाराष्ट्राच्या विविध भागांतील जवळजवळ ४०० कलाकार सहभागी होणार आहेत.
दशावतार, जाकडी, दांडपट्टा, लेझीम, कोंबडा, आदिवासी ढोल, पालखी, लेझीम, बाल्या, तारपा यांसारख्या महाराष्ट्रातील लोककलांचे दर्शन या रथयात्रेतून मुंबईकरांना घडणार असल्याची माहिती श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.