मुंबई : पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी आज उच्च न्यायालयाने अटकेत असलेल्या तीन आरोपींना २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पीएमसी बँक प्रकरणातील आरोपी राकेशकुमार वाधवान, सारंग वाधवान आणि वरियम सिंग यांना न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. राकेशकुमार आणि सारंग हे पिता-पूत्र आहेत. दरम्यान, पीएमसी बँक प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले आहे. न्यायमूर्ती रमन्ना यांच्या खंडपीठानं पीएमसी बँक घोटाळा प्रकरणाची याचिका स्वीकारली आहे. आयुष्याची कमाई बँक घोटाळ्याच्या गर्तेत अडकल्यानं जवळपास १५ लाख खातेदार हवालदिल झालेत. संपूर्ण सुरक्षा आणि शंभर टक्के विमा देण्याची मागणी याचिकाकर्ता बिनोज मिश्रा यांनी याचिकेतून केली आहे.
Maharashtra: Accused in PMC Bank case, Rakesh Wadhawan, Sarang Wadhawan and Waryam Singh have been sent to judicial custody till 23rd October by Esplanade Court, Mumbai. https://t.co/DM4zwKnPyA
— ANI (@ANI) October 16, 2019
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. खातेदारांच्या पैशांवर अनेकांनी वैयक्तिक मालमत्ता जमवली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंहने मुंबईच्या जुहू भागात २५०० कोटींचा एक प्लॉट घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अमृतसरमध्ये लेमन ट्री नावाचे फाईव्ह स्टार हॉटेल खरेदी केले आहे.
आर्थिक घोटाळ्यात सापडलेल्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये अनेकांचे पैसे अडकल्याने हजारो खातेदार हवालदिल झाले आहेत. पैसे काढता येत नसल्याने अनेक ग्राहक तणावाखाली आहेत. या तणावात दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) अशी या खातेदारांची नावे आहेत. नोकरी गमावलेल्या गुलाटी यांचे आर्थिक गाडे बँकेत ठेवलेल्या रकमेच्या व्याजावर सुरू होते. तर व्यावसायिक असलेले फत्तेमुल पंजाबी मोठी रक्कम बँकेत अडकल्यामुळे प्रचंड चिंतेत होते.
पीएमसी बँकेवर घालण्यात आल्याने अनेक खातेदार आणि गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. आधी एक हजार रुपये काढण्याची मर्यादा होती. त्यानंतर २५ हजार करण्यात आली. मात्र, सातत्याने आंदोलन आणि मागणी वाढल्यानंतर यात वाढ करुन ती ४० हजार रुपये करण्यात आली. मात्र, अनेकांना लग्नासाठी तसेच महाविद्यालयीन शुल्क भरण्यासाठी जास्तीचे पैसे हवे आहेत. मात्र, पैसे असूनही ते काढता येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच पैसे परत मिळण्याची शाश्वती वाटत नसल्याने अनेक जण तणावाखाली आहेत.