मुंबई : कोरोना महामारीमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. राज्यात मास्क घालण्याच्या सक्तीतून सूट देण्याबाबत महाराष्ट्र सरकार विचार करत असल्याचं समोर आलंय. मात्र यावर राज्यातील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
यासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र राज्यात मास्कची सक्ती हटवली जाईल असा गैरसमज लोकांनी काढून टाकावा. मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगले हत्यार आहे."
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे सध्यातरी राज्यात मास्क घालणं बंधनाकारक असल्याचं समजतंय. मास्कमुक्ती संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. टास्क फोर्सचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मास्कमुक्तीसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची घोषणा सरकारने केलीये.
कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांच्या म्हणण्यानुसार, मास्कचा वापर बंधनकारक नसल्याचा निर्णय घेतलेल्या इतर देशांचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. अभ्यासानंतर त्याचा अहवाल तयार करून सरकारला दिला जाईल. मात्र, राज्याला मास्क फ्री व्हायला वेळ लागेल. अशा परिस्थितीत पुढील काही दिवस राज्यात कोरोना विरुद्धच्या लढाईत मास्कची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.