Mandwa to Gateway Ferry: मुंबईकरांना एकद- दोन दिवसांची सुट्टीसुद्धा सुख वाटते. अशा वेळी शहरी धकाधकीपासून दूर जात कुठेतरी निवांत क्षण व्यतीत करण्यासाठीच मुंबईकर आग्रही दिसतात. यादरम्यान काही ठिकाणांना हमखास पसंती मिळते. जिथं पोहोचण्यासाठी प्रवासात जास्त वेळही जात नाही आणि प्रवासाची माध्यमंही अगदी सहजपणे उपलब्ध असतात. असंच एक ठिकाण म्हणजे अलिबाग. (alibaug news)
फक्त मुंबईकरच नव्हे, तर अनेकांसाठी हक्काचं Weekend Gateway असणारं हे ठिकाण. त्यातही रस्ते मार्गानं तीन- साडेतीन तासांचा प्रवास करण्यापेक्षा मुंबईतून गेटवे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का इथून निघणाऱ्या बोटींच्या माध्यमातून इथं पोहचणाऱ्यांची संख्या मोठी. पण, पुढील काही महिन्यांसाठी मात्र हे चित्र बदलणार आहे. कारण, मांडवा ते गेट वे या मार्गावर सुरु असणारी जलवाहतूक 26 मे ते 31 ऑगस्ट या जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळादरम्यान बंद राहणार आहे.
मेरी टाईम विभागाकडून जलवाहतूक करणाऱ्या विभागांना यासंदर्भातील सूचना पत्राद्वारे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फक्त वीकेंडच नव्हे, तर दर दिवशी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. पण, आता मात्र या मंडळींच्या प्रवासाची वेळ वाढणार असून, त्यांना रस्ते मार्गाला प्राधान्य द्यावं लागणार आहे. दरम्यान, भाऊच्या धक्क्यावरून M2M रोरो फेरी सेवा मात्र सुरु राहणार असल्यामुळं प्रवाशांना काहीसा दिलासा असेल.
कोणत्या Boat सेवा बंद?
रस्तेमार्गानं अलिबाग आणि नजीकच्या पट्ट्यापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई आणि उपनगरांतून अनुक्रमे साडेचार आणि तीन तासांचा कालावधी लागतो. पण, जलवाहतुकीचा पर्याय निवडल्या हा प्रवास अवघ्या तासाभरात किंवा त्याहून कमी वेळात पूर्ण करता येतो. पण, ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा, One Day Picninc चं प्रमाण वाढतं तेव्हाच ही जलवाहतूक बंद असणार आहे. ज्यामध्ये मालदार, अजंठा, पीएनपी आणि वेळप्रसंगी अपोलो सेवाही बंद राहण्याची माहिती मिळत आहे.
तिथं भाऊचा धक्का ते रेवस जेट्टी या मार्गावरून सुरु असणाऱ्या जलवाहतुकीवरही मान्सूनदरम्यान परिणाम होत असल्यामुळं ही सेवाही ठप्पच असते. पण, रो- रो सेवा सुरु असल्यामुळं अलिबाग गाठणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो. तेव्हा तुम्हीही येत्या काळात अलिबागच्या दिशेनं जाणार असाल तर हाताशी जास्त वेळ ठेवून आणि तिथं पोहोचण्यासाठीचे पर्यायी मार्ग शोधून तयार राहा.