पावसाचं पाणी घरात साचताच 'मनसे'चा खोचक सवाल, 'केम छो वरळी'?

पावसाचं पाणी घरात शिरल्याने अनेकांचे हाल झाले आहेत.

Updated: Sep 23, 2020, 12:36 PM IST
पावसाचं पाणी घरात साचताच 'मनसे'चा खोचक सवाल, 'केम छो वरळी'?  title=

मुंबई : मुंबईत मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुंबई, नवी मुंबईसह उपनगरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी सकाळीही मुंबईत पावसाचा जोर कायम होता. सततच्या पावसाने मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. दक्षिण मुंबईतील वरळीतही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र असून अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. 

शिवसेना नेते आदित्य यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत पावसाचं पाणी घरात शिरल्याने अनेकांचे हाल झाले आहेत. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. 'केम छो वरळी...' असा खोचक सवाल करत त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओतून, पावसाचं पाणी घरात शिरल्याने काय परिस्थिती उद्भवली आहे, याचा अंदाज येतो आहे. घरातील सामानाचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे.

मुंबईतील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. दक्षिण मुंबईतील बहुतांश भागांमध्ये पाणी साचल्याने अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अनेकांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. 

वडाळा, माझगाव डॉक, भायखळा, दादर, हिंदमाता हे भाग जलमय झाले आहेत. अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळं अत्यावश्यक सेवांसाठी सुरु असणारी रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. गोरेगाव, अंधेरी सबवे याशिवाय अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने बहुतांश मार्गांवरी रस्ते वाहतूकही इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.