Mumbai Metro 3: गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबई मेट्रो 3 अखेर प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लोकार्पण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयारी सुरू केली असून मेट्रोच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. मेट्रो-3च्या लोकार्पणानंतर आरे-बीकेसी टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. आरे ते बीकेसीदरम्यान मेट्रोचे वेळापत्रक कसं असेल व तिकिट दर काय असणार, याबाबत जाणून घेऊया.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गिका लोकार्पणानंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. भुयारी मेट्रो मार्गिकेवरील 12.5 किमीचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. या मार्गावर 10 स्थानकांचा समावेश असणार आहे. त्यापैकी ९ भूमिगत स्थानके तसेच आरे येथे एक ग्रेड टर्मिनस स्टेशन उभारण्यात आले आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यासाठी ६.५ मिनिटांनी ट्रेन चालवण्यात येतील प्रत्येक फेरीमध्ये २५०० प्रवासी एका वेळेला प्रवास करतील, अशी अपेक्षा एमएमआरडीएने व्यक्त केली आहे.
पहिल्या टप्प्यात 9 गाड्यांसह मेट्रो सेवा सुरू होणार आहे या मेट्रोचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहे. प्रत्येक सडासहा मिनिटांनी एक मेट्रो गाडी धावणार आहे. तर 12.5 किमी मार्गिकेवर दिवसाला मेट्रोच्या 96 फेऱ्या होतील. मेट्रो 3 मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांची रचना ताशी 85 किमी वेग अशी आहे. आरे-बीकेसी टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना जलद प्रवास करता येणार आहे. मुंबईकरांना या मार्गावरुन आरे ते बीकेसी या प्रवासासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत. या मार्गिकेवरील कमीत कमी भाडे 10 रुपये असेल. तसंच, कुलाबा-सीप्झ-आरे कॉलनीपर्यंत मार्गिका सुरू झाल्यानंतर तिकिट 70 रुपयांपर्यंत असेल.
एमएमआरसीच्या वेळापत्रकानुसार आरे-बीकेसी दरम्यान सोमवार ते शनिवार या काळात सकाळी 6.30 ते रात्री 10.30 या वेळेत मेट्रो 3 ची सेवा सुरू राहणार आहे. रविवारी सकाळी 8.30 ते रात्री 10.30 दरम्यान मेट्रो 3ची सेवा पहिल्या टप्प्यादरम्यान सुरू राहणार आहे.
मुंबई विमानतळाला पोहचण्यासाठी या मार्गिकेतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टी-२ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टी-१ ह्या स्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टी-२ ह्या स्थानकात १९ मीटर लांब भारतातील सर्वात मोठा इलेव्हेटर सरकता जिना आहे. तसेच मरोळ नाका स्थानकातून मेट्रो -३ मेट्रो -१ ला जोडण्याचे काम पुर्ण झाले आहे. या मेट्रो मार्गिकेवर १ किलोमीटरच्या अंतरावर स्थानके आहेत. त्याचबरोबर मेट्रो ड्रायव्हरलेस असल्याने स्थानकात फायर सेफ्टी, मेट्रो डोअर ओपनिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, इलिव्हेटर मॅनेजमेंट यासह आपत्कालिन मदत याबाबत विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
2011 मध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा त्यांची किंमत २३ हजार कोटी होती. मेट्रो कारशेडचे काम ९० टक्के पुर्ण झाले आहे.२२ हेक्टर जागेवर ते साकारले आहे आणि आज मेट्रो-३ प्रकल्पाची किंमत 36 हजार कोटी झालेली आहे.