मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून (सीएसएमटी) हाकेच्या अंतरावर असणारा पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता अनेक हदयद्रावक कहाण्या समोर येत आहेत. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर ३१ जण जखमी झाले आहेत. या मृतांपैकी एक असणारा झाहीद खान याने ही दुर्घटना झाली तेव्हा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या वडिलांना वाचवले. झाहीद आणि त्याचे वडील सिराज खान हे दोघे चामड्यांच्या बेल्ट विक्रीचा व्यवसाय करायचे. घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर त्यांचे दुकान आहे. दुकानातील माल आणण्यासाठी दोघेजण नेहमीप्रमाणे क्रॉफेड मार्केटमध्ये गेले होते. त्यावेळी हिमालय पुलावरून जात असताना पूल कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. झाहीदला पूल कोसळणार हे समजले तेव्हा त्याने सर्वप्रथम वडिलांच्या छातीवर धक्का मारून त्यांना मागे ढकलले. त्यामुळे सिराज खान पूलाच्या ढिगाऱ्याखाली येण्यापासून वाचले. मात्र, सिराज यांच्या डोळ्यांदेखत त्यांचा मुलगा ढिगाऱ्याखाली गाडला गेला. सिराज या दुर्घटनेतून वाचले असले तरी त्यांच्या पाठीला आणि छातीला गंभीर इजा झाली आहे. त्यासाठी सिराज यांना डॉक्टरांनी रुग्णालयातच ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, झाहीदच्या अंत्ययात्रेला हजेरी लावण्यासाठी त्यांनी रुग्णालयात राहण्यास नकार दिला.
सिराज खान यांच्या घाटकोपरमधील घरी झाहीदच्या अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी जमली होती. झाहीदच्या पाठीमागे त्याची पत्नी, दोन मुली, लहान भाऊ असा परिवार आहे. झाहीदच्या जाण्याने आमच्या वंशाचा दिवा विझला, अशी प्रतिक्रिया झाहीदच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
दरम्यान, सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता ए. आर. पाटील आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते या दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. तर निवृत्त प्रमुख अभियंता एस. ओ. कोरी आणि निवृत्त उपप्रमुख अभियंता आर. बी. तरे यांचीही सविस्तर चौकशी केली जाणार आहे. दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर झाला असून हिमालय पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट योग्यप्रकारे न झाल्याची बाब निष्पन्न झाली. हे ऑडिट करणाऱ्या डी डी देसाई असोशिएटसला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले असून या सर्वांवर गुन्हेही दाखल केले जातील.