Mumbai Mono Railway News: मोनो सुरू होऊन कित्येक वर्षे लोटली मात्र तरीही अजून प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मोनोला लाभला नाहीये. मोनो एकप्रकारे प्रशासनासाठी पांढरा हत्ती ठरला आहे. मोनोची प्रवासी क्षमता आता वाढण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएने दहा मोनो ट्रेन खरेदी करत असून त्यापैकी दोन गाड्या मुंबईत नुकत्याच दाखल झाल्या आहेत. त्यामुळं मोनोच्या प्रवासी क्षमतेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एमएमआरडीएने तोट्यात असलेल्या मोनो रेलला नफ्यात आणण्यासाठी आणखी दहा गाड्या खरेदी केल्या आहेत. सध्या चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावर 10 गाड्या असून 15 मिनिटाला एक याप्रमाणे 142 फेऱ्या चालवल्या जात आहेत. प्रवाशांना मोनोसाठी 15 मिनिटे ताटकळत राहावे लागते. प्रवाशांचा हा वेळ कमी करण्यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी प्रत्येकी चार डब्यांच्या दहा गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यापैकी दोन गाड्या मोनोच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
मोनोच्या ताफ्यात दाखल झालेल्या दोन गाड्यांची क्षमता दहा टक्के अधिक आहे. सध्या धावत असलेल्या गाड्यांच्या तुलनेत नव्याने खरेदी केलेल्या गाड्यांची प्रवासी क्षमता दहा टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळं चार डब्यांच्या एका मोनो ट्रेनने जास्तीत जास्त 624 प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. सध्या धावत असलेल्या मोनोच्या एका गाडीत 568 प्रवासी प्रवास करु शकतात. मात्र नवीन गाड्यांमुळं हीच प्रवासी संख्या 56ने वाढली आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार असून मोनोच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.
2014मध्ये मोनो रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. मोनोच्या लोकार्पणानंतर अद्याप एकही नवीन ट्रेन आणण्यात आली नव्हती. त्यामुळं प्रवाशांना ट्रेनसाठी खूप वाट पाहावी लागत होती. फेऱ्या कमी असल्याने मोनोला प्रवाशांचा प्रतिसादही कमी मिळत होता. प्रवाशांची संख्या कमी असल्याने प्रशासनासाठी मोनो पांढरा हत्ती ठरला होता. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ला मोनो रेल्वेमुळं आत्तापर्यंत 500 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.
मोनोला पुन्हा नफ्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. आता मोनोची संख्या वाढवण्यात आल्यानंतर आणखी एक प्लान एमएमआरडीएने केला आहे. मोनोला रेल्वे स्थानक आणि नव्याने तयार होणाऱ्या मेट्रो लाइनला कनेक्ट करण्यात येण्याची योजना आखण्यात येत आहे.