मुंबई : राज्यात प्लॅस्टिक बंदी कायम असून यापुढे व्यापाऱ्यांना प्लॅस्टिक वापरास मुदतवाढ दिली जाणार नाही. प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करुन राज्यातील प्लॅस्टिक बंदीची मोहिम काटेकोरपणे राबविण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. मंत्रालयात राज्यातील प्लॅस्टिक बंदी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, पर्यावरण विभागाचे सर्व आधिकारी उपस्थित होते.
प्लॅस्टिक बंदी मोहिम सुरु असून व्यापाऱ्यांना आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती संपत असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच वैयक्तीक कारवाईची मोहिम सुरु करावी असे ही रामदास कदम यांनी यावेळी आदेश दिले आहेत. २३ जूनला राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली होती. पण त्यानंतर ही किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात होता. प्लॅस्टिक बंदीला तीन महिने पूर्ण झाले.
प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी आणि कागदी पिशव्या वापरण्याचं आवाहन विविध यंत्रणांमार्फत करण्यात येत आहे. पण लोकं अजूनही याकडे दुर्लक्ष करता आहेत. फेरीवाले, भाजीवाले, दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करत आहेत. प्लॅस्टिक बंदीनंतर महापालिकेने सुरुवातीला मोठी मोहीम राबवली पण नंतर ही मोहीम काहीशी मंदावली. बाजारात आताही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे.
प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर प्लास्टिकचा साठा संपवण्यासाठी व्यापाऱ्यांना आणि कंपन्यांना तसेच पुनर्चक्रिकरणाची व्यवस्था उभारण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे. पण आणखी मुदतवाढ मिळावी अशी मागणी उत्पादक संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत आता मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.