Omicron Variant Update : देशात ओमायक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवडाभरात ओमायक्रॉनचा संसर्ग अनेक पटींनी वाढला आहे. देशातील तब्बल 14 राज्यं कोरोनाच्या या नवीन प्रकाराच्या विळख्यात आहेत, तर देशभरात 225 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 65 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आहेत. तर दिल्लीत 54 प्रकरणांची नोंद झाली आहे.
ओमायक्रॉनचा धोका वाढत असला तरी लोक याबद्दल फारसे गंभीर नाहीत. ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यात अनेक निर्बंध आहेत.
ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार
ओमायक्रॉन विषाणू डेल्टापेक्षा तिप्पट पटीने संसर्गजन्य असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. राज्यांनी परिस्थिती पाहून नाईट कर्फ्यू आणि कंटेनमेंट झोन तयार करणं यासारख्या आवश्यक उपाययोजनांसाठी सतर्क राहावं, असं निर्देश केंद्राने दिले आहेत. गेल्या 18 दिवसांत ओमायक्रॉन बाधितांची संख्या 100 पटीने वाढली आहे. असं असलं तरी एकाही रुग्णाला आयसीयूमध्ये ठेवावं लागलं नाही, ही दिलासादायक बाब आहे.
राज्यांनी जिल्हा स्तरावर वॉर रुम कराव्यात
केंद्र सरकारने राज्यांना ओमाक्रॉनसाठी वॉर रूम तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. ओमायक्रॉन विषाणू वेगाने पसरत आहे. साप्ताहिक संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास किंवा आयसीयू बेड 40 टक्क्यांहून अधिक भरले असल्यास, जिल्हा किंवा स्थानिक स्तरावर नाईट कर्फ्यू किंवा कंटेनमेंट झोन तयार करण्यासाठी त्वरित पावले उचलली जावीत असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
कंटेनमेंट झोनचं धोरण स्वीकारलं पाहिजे
डेल्टाबरोबरच ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग देशातील विविध भागात पोहचला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कठोर पावलं उचलवी लागतील. चाचणी, ट्रॅक आणि तपासणी करत कंटेनमेंट झोनचं धोरण पाळावं लागणार आहे.
या नियमांची अंमलबजावणी करा
कंटेनमेंट झोन : ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रीचा कर्फ्यू, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यापासून रोखणं तसंच विवाह आणि अंत्यसंस्कारातील लोकांची संख्या मर्यादित ठेवावी असं सांगण्यात आलं आहे. तसंच कार्यालये, उद्योग आणि सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी करावी लागेल. रुग्णांच्या संख्येनुसार कंटेनमेंट झोन आणि बफर झोन निश्चित करावे लागतील. जीनोम सिक्वेन्सिंग प्राधान्याने केलं पाहिजे असं निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत.
टेस्टिंग आणि तपासणी : ICMR आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मानकांनुसार तपास आणि देखरेखीची प्रणाली लागू करण्यात यावी. घरोघरी जाऊन रुग्णाची ओळख पटवण्यासाठी सर्वेक्षण केलं पाहिजे. आरटी-पीसीआर चाचणीचं प्रमाण वाढवावं. कोरोनाबाधित व्यक्तीला वेळेवर तपासणी करून उपचाराची सुविधा मिळावी. परदेशातून येणाऱ्या लोकांवर स्थानिक प्रशासनाने लक्ष ठेवावं, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
क्लीनिकल मैनेजमेंट : ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता रुग्णालयांमधील खाटांची क्षमता वाढवण्याची गरज. रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलिंडर, औषधांचा साठा आणि इतर आरोग्यविषय वस्तूंचा पुरेसा साठा ठेवावा, होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी किट उपलब्ध करून द्याव्यात. कॉल सेंटर्स आणि घरोघरी भेटी देऊन रुग्णांवर लक्ष ठेवले पाहिजे.
लसीकरण : कोरोनाचा वाढता वेग पाहता लसीकरणावर भर द्यायला देण्याची गरज असल्याचं केंद्राने म्हटलं आहे, पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं गरजेचं आहे. याशिवाय सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या वॉर रूम पुन्हा तयार कराव्यात. योग्य आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी संपूर्ण व्यवस्थाही सुनिश्चित करा जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात राहील असे निर्देश केंद्राने सर्व राज्यांना दिले आहेत.