मुंबई : मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यू झालाय. विष प्राशन केल्यानंतर पाटील यांच्यावर मुंबईतल्या जेजे रुग्णालायात उपचार सुरु होते.
सरकारच्या दारात अनेकदा चकरा मारूनही त्यांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले. आता त्यांचा मृत्यू झाल्याने विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठत आहे.
‘हा सरकारी अनास्थेचा बळी नाही सरकारनं घेतलेला बळी आहे, सरकार क्रूर आहे, आज धर्मा पाटील यांचा बळी गेला आता पैसे देऊन काय फायदा, हे सरकार कुणाचेही नाही फक्त लूट चालू आहे, शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे सरकार आहे, धर्मा पाटील यांच्या मृत्यू नंतर धर्मा च्या विरोधात अधर्मा चा विजय झाला आहे, हे सरकार शेतकरी संपवायला निघालं आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केलीये.
धर्मा पाटील यांच्या जमिनीची ज्यांनी भ्रष्ट्र हेतूने चुकीची परिगणणा केली आणि जिल्हा स्तर ते मंत्रालय धर्मा पाटील यांनी ज्यांच्या ज्यांच्या कडे न्याय मागितला आणि त्यांचे प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले त्या सर्वांवर 302 चा गुन्हा दाखल करा. @Dev_Fadnavis pic.twitter.com/b1RP0OFx60
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 29, 2018
जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली !
या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री @dev_fadnavis यांना लाज वाटली पाहिजे.— Supriya Sule (@supriya_sule) January 28, 2018
तर खासदार सुप्रीय सुळे यांनीही सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढले आहेत. ‘सरकारची धोरणे शेतक-यांची कंबरडे मोडणारी आहेत. संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली होती. तरीही सरसकट कर्जमाफी दिली नाही. सरकार शेतक-यांना फसवतंय’, असं त्या म्हणाल्या.
‘धर्मा पाटील यांना मी भेटलो होतो. त्यांच्या शेजारी ७४ गुंठे जमीन असलेल्या शेतक-याने एजंट मध्यस्थी करून पावणे दोन कोटी रूपये भरपाई घेतली. धर्मा पाटील यांनी एजंट माध्यमातून प्रयत्न केले नाही म्हणून ४ लाख पदरात पडले. ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे’, असं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय.