'जामीन मिळाला तरीही दोषींवर...' मुख्यमंत्र्यांचं मृत मुलांच्या पालकांना आश्वासन

Pune Car Accident : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. दरम्यान, अपघातात मृत झालेल्या मुलांच्या पालकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10 लाखांची मदत सुपूर्द करण्यात आली.

राजीव कासले | Updated: Jun 25, 2024, 05:45 PM IST
'जामीन मिळाला तरीही दोषींवर...' मुख्यमंत्र्यांचं मृत मुलांच्या पालकांना आश्वासन title=

Pune Car Accident : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) जामीन मंजूर केलाय. त्याला तात्काळ आत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. मात्र, त्याची सुटका आज होणार नसून उद्यापर्यंत वाट पहावी लागणार असल्याची माहिती मिळतेय. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने हायकोर्टात याचिका केली होती. अपघातानंतर ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीला जामीन दिल्यानंतर पुन्हा त्याला ताब्यात घेण्यात आलं ही अटक बेकायदा असल्याचं त्याच्या आत्यानं हायकोर्टातील याचिकेत म्हटलं होतं.

'जामीन मिळाला तरीही दोषीवर कारवाई करणारच'
दरम्यान, पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात (Porsche Car Accident) मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या 10 लाखांचा धनादेश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही या प्रकरणातील दोषींवर कारवाई करणारच असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी या मुलांच्या पालकांना आशवस्त केलं. पुण्यातील पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करू तसंच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असे सांगितले होतं. तसंच मध्य प्रदेशचे रहीवाशी असूनही त्यांना झालेल्या वैयक्तिक नुकसान पाहता सहवेदना व्यक्त करण्यासाठी त्याना राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून 10 लाख रुपयांची मदत म्हणून देण्याचे जाहीर केलं होतं. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मदतीचे धनादेश त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. 

यावेळी या दोन्ही मुलांच्या पालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. तसेच आपल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण नव्याने हाती घेत सर्व दोषींवर कारवाई केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचेही आभार मानले.

अपघात प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?

- 19 मे, 2024 रोजी अपघात, त्याच रात्री जामीन 
 
- पुणे पोलिसांकडून पुनर्विचार याचिका दाखल 

- 21 मे, 2024 पुन्हा बाल निरीक्षणगृहात रवानगी  

- 21 मे, 2024पासून अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहात 

-  33 दिवस आरोपी बाल सुधारगृहात 

- आरोपीच्या आत्याची थेट हाय कोर्टात धाव 

- 25 जून अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर