मुंबई : रेल्वेने प्रवाशांसाठी पेपरलेस मोबाईल तिकीट प्रणाली उपलब्ध करुन दिली आहे. मात्र या मोबाईल तिकिटमध्ये जीपीएसला यंत्रणेला नेटवर्कची समस्या येत असल्याने पेपरलेस मोबाईल तिकीट काढताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते.
यासाठी मोबाईल तिकिट सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी क्युआर कोड हा नवीन पर्याय रेल्वेच्या क्रिसकडून, अर्थात सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम कडून देण्यात येणार आहे.
सध्या या क्युआर कोडवर काम सुरु असून दोन ते तीन दिवसानंतर प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. तिकीट खिडक्यावरील रांगेतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी तसेच प्रवाशांना तात्काळ तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी मोबाईल तिकीट सेवा मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात आली. या पेपरलेस मोबाईल तिकीटचा लाभ घेताना जीपीएस यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे.
रेल्वे हद्दीत ३० मीटरपर्यंत असल्यास जीपीएस यंत्रणेद्वारे मोबाईल तिकीट काढतात. मात्र काहीवेळा तिकिट काढताना जीपीएस नेटवर्कची समस्या येते यासाठी तिकिट खिडक्याजवळ क्युआर कोडचा पर्याय देण्यात येणार आहे क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर पेपरलेस मोबाईल तिकिट उपलब्ध होणार आहे.