मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी 3 मे पर्यंत भोंगे उतरवा, असा अल्टिमेटम सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात दिला. पण त्याचा दणदणीत परिणाम झाला तो उत्तर प्रदेशात. योगींनी (Yogi Aadityanath) मशिदींवरचे भोंगे उतरवून दाखवले. सहाजिकच राज ठाकरे यांनी पुन्हा योगीस्तुती सुरू केली आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधण्याची आयती संधी शोधली.
उत्तर प्रदेशात राज इफेक्ट
उत्तर प्रदेशात राज ठाकरे इफेक्ट दिसतोय. उत्तर प्रदेशात मशिदीवरचे भोंगे उतरवले जात आहेत. मुख्यमंत्री योगींनी भोंगे उतरवण्याचे आदेश देताच कारवाईनं वेग घेतला आणि उत्तर प्रदेशातले 11 हजार भोंगे उतरले सुद्धा. योगींच्या प्रेमात असलेल्या राज ठाकरे यांनी मग एका दगडात दोन पक्षी मारले. योगींचं कौतुक करतानाच महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
मशिदीवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे अभिनंदन, आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कोणीच नाही. आहेत ते सत्तेचे 'भोगी'. महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो. हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. असं ट्विट राज ठाकरे यांनी केलंय.
राज ठाकरे यांनी भोंगा हाती घेताच योगींनी उत्तर प्रदेशात भोंगे उतरवून दाखवले. उत्तर प्रदेशात 11 हजार भोंग्यांचा आवाज बंद झालाय. 35 हजार मंदिर-मशिदींच्या आवाजावर बंधनं आली आहेत. 30 एप्रिलपर्यंत भोंग्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री योगींची अधिकारी आणि हिंदू-मुस्लीम नेत्यांबरोबर बैठक झाली. भोंगे वापरा, मात्र आवाज मर्यादित ठेवण्याच्या योगींच्या सूचना आहेत. हिंदू-मुस्लीम नेत्यांची भोंग्याचा आवाज कमी करण्यावर सहमती दर्शवली. मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराची पहाटेची भोंग्यावरुन आरती बंद झाली. लखनऊ इदगाहच्या इमामांनी मशिदींना आवाज कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तर प्रदेशातल्या या कारवाईमुळे राज ठाकरेंना राज्य सरकारवर हल्लाबोल करायला आणखी बळ मिळालं. ५ जूनच्या अयोध्या दौ-याआधी योगींचं सातत्यानं कौतुक करुन राज ठाकरेंनी अयोध्या दौ-याचा मार्ग प्रशस्त करुन घेतलाय. राज बोलले आणि भोंगे उतरले हा मेसेज देशभरात गेला असला तरी महाराष्ट्रात मात्र भोंगे बंद होणार का? हा खरा प्रश्न आहे. कारण मनसेनं कट्टर हिंदुत्व स्वीकारलं असलं तरी शिवसेनेचे पाय मात्र दोन दगडांवर आहेत.