"...आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो", राज ठाकरेंचा अप्रत्यक्षरित्या टोला

राजकीय घडामोडींपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र दूर होते. 

Updated: Jun 30, 2022, 02:45 PM IST
"...आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो", राज ठाकरेंचा अप्रत्यक्षरित्या टोला title=

Raj Thackeray On Political Crisis: राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचं सरकार सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या राजकीय घडामोडींपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र दूर होते. या राजकारणावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र राज ठाकरे आज ट्विटरवरून व्यक्त झाले आहेत. त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अप्रत्यक्षरित्या टोला हाणला आहे. 

"एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो!", अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर ही प्रतिक्रिया आल्याने त्याचा संदर्भ सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असल्याचं मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केलं आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे ट्वीट करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राज ठाकरे यांची जुनी क्लिप व्हायरल होत आहे. मुंबई महापालिकेत मनसेचे नगरसेवक फोडल्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आहे. त्यात मनसेचे नगरसेवक फोडल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला होता.