Rajyasabha Election : सहाव्या जागेसाठी चुरस, शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत

'भाजपाचा उमेदवार जिंकणार, आमच्याकडे पुरेशी मतं' चंद्रकांत पाटील यांना विश्वास

Updated: Jun 3, 2022, 03:26 PM IST
Rajyasabha Election : सहाव्या जागेसाठी चुरस, शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत title=

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election 2022) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आज संपल्याने राज्यसभेची निवडणूक होणार हे आता स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने राज्यसभेची निवडणूक होणार आहे. 

राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात आहेत. पहिले पाच उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांनी विजय होणार आहेत. मात्र, सहाव्या जागेसाठी होणारी लढत चुरशीची होणार आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 वी जागा बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली. पण राज्यसभेची 6 वी जागा लढवण्यावर भाजप ठाम असल्याने निवडणूक अटळ आहे. 

महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात तासभर चर्चा झाली. या चर्चेत महाविकास आघाडीच प्रस्ताव होता भाजपने राज्यसभेची तिसरी जागा मागे घ्या आणि विधानपरिषदेची एक जागा जास्त देतो. 

तर भाजपाच प्रस्ताव होता तुम्ही राज्यसभेची दुसरी जागा मागे घ्या त्याबदल्यात विधानपरिषदेची पाचवी जागा भाजप लढवणार नाही. पण त्यानंतर कुठल्याच संवाद मविआ आणि भाजपमध्ये झाला नाही. त्यामुळे निवडणूक अटळ आहे, भाजप तिसरी जागा जिंकेल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

पुरेसं संख्याबळ आमच्याकडे आहे, काही कॉमन व्होटसाठी दोघंही प्रयत्न करतील. आमच्याकडे पुरेशी मतं आहेत असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.