Corona | तुमच्या शहरात, गावात कोरोनाने थैमान घातल्याची ही आहेत काही कारणे

राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मृत्युदर वाढतोय, त्यासोबत काही मध्यमवयाचे तसेच तरुणांचाही

Updated: Mar 30, 2021, 03:43 PM IST
Corona | तुमच्या शहरात,  गावात कोरोनाने थैमान घातल्याची ही आहेत काही कारणे title=

मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मृत्युदर वाढतोय, त्यासोबत काही मध्यमवयाचे तसेच तरुणांचाही मृत्यू होत असल्याने जनतेमध्ये कोरोनाविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यंतरी कोरोना पसरण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर महाराष्ट्रात ज्या-ज्या भागात मास्क वापरणे बंद झाले, हात धुण्याचे प्रमाण, सेनेटाईझ करणे बंद झाले, त्या ठिकाणी कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी स्मशानभूमीत प्रेतं जाळण्यासाठी जागा कमी पडत असल्याचे व्हीडिओ देखील व्हायरल झाले आहेत.

मास्क वापरण्याचा सर्वात मोठा फायदा काय?

ज्या व्यक्ती बाधित आहेत, त्यांनी मास्क वापरल्याने जास्त फायदा होतो, कारण अनेकांना माहित नसतं की, आपण बाधित आहोत, तरी देखील लोकांच्या संपर्कात ते येत असतात, पण मास्क वापरल्याने विषाणू तोंडातून, श्वासातून जास्त दूरपर्यंत पसरण्याचं प्रमाण कमी होतं. मास्क वापरणाऱ्याच्या नाकातोंडापर्यंत इतराच्या श्वासातून विषाणू सहज येऊ शकत नाही, म्हणून सर्वांनी मास्क वापरला तर विषाणू पसरण्याचं प्रमाण कमी असतं. बाधित व्यक्ती मास्क वापरत नसेल तर तो सुपरस्प्रेडर ठरु शकतो.

अफवा, गैरसमज आणि निष्काळजीपणाने कोरोना वाढला...

कोरोना गेला आता मास्कमूस्क कोण वापरत नाही, असा काही महिन्यापूर्वी गैरसमज, मागील ३ महिन्यापासून बिनधास्त मास्कशिवाय वावर, हातधुणे दूरच...अशा ठिकाणी कोरोना वाढलाय.

कोरोना हा काही डॉक्टरांच्या कमाईचा स्टंट होता, प्रत्यक्षात कोरोना नव्हताच, म्हणून मास्क  वैगरे खोटं होतं, सामूहिक चर्चेतून गैरसमजाला उधाण यामुळे कोरोना वाढीला जागा.

लस घेतल्यानंतर अनेकांचा जीव जातो. लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोना होतो. लसीने माणसाचा डीएनए बदलतो, माणूस नपूसंक होतो, असे मोठे गैरसमज - अफवा यामुळेही कोरोना थोपवण्यास भविष्यात अडचणी.

लस घेतल्यानंतर कोरोना होतोय...काय कारण आहे

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एखाद्याला कोरोना झाला, तर तो होवू शकतो. लस किती टक्के प्रभावी आहे, तसेच लसीचा दुसरा डोस, आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत लस घेतलेल्या व्यक्तीसाठी कोरोनाचा धोका टळलेला आहे, असं म्हणता येत नाही. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे लसीचा फरक कमी अधिक असू शकतो. म्हणूनच लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, हात सॅनेटाईझ करण्याचे बंधन कायम आहे. लस घेतल्यानंतर त्रास होवू शकतो, लहान बाळांना देखील वेगळ्या आजारावर लस घेतल्याने काही दिवस त्रास होतोच.

लसीकरणाचं जेवढं प्रमाण वाढेल तेवढा कोरोना संपेल

लसीच्या दोन डोसांमधील दिवसांचे अंतर देखील सरकारकडून वाढवण्यात आलं आहे, जेणे करून लसीचा प्रभाव आणखी जास्त होईल. तसेच ज्या प्रमाणे व्हायरस आपलं स्वरुप बदलतो, त्या प्रमाणे लस अपडेट होवून येतील आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण होईल, कोरोनाचा बिमोडजवळ आलेला असेल.

मास्क आणि हात न धुण्याची शिक्षा

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्याच्या ठिकाणी कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. अर्थातच खासगी डॉक्टरांकडे बेड शिल्लक नसल्याच्या तक्रारी आहेत, तर काही ठिकाणी वेंटीलेटरवर रूग्ण असताना, त्यांच्याकडे लक्ष देण्यास कुणीही नसल्याचे व्हीडिओ देखील व्हायरल होत आहेत.

ज्यांचं नुकसान झालं, फटका बसला त्यांनी सामूहिक बंद पाळलाय...

काही गावं आणि शहरांमध्ये कोरोनाने एवढे बळी घेतले आहेत की, या धास्तीनं गाव खेडी बंद आहेत, या गावांमध्ये आणि शहरांमध्ये स्वत:हून लोक बाहेर पडत नसल्याने स्मशान शांतता पसरली आहे. १० हजार लोकसंख्या असलेल्या काही गावांमध्ये महिन्याभराच्या आत १५ ते ३० लोकांचा मृत्यू झाल्याची देखील उदाहरणं आहेत.