पीएमसी बॅंकेच्या खातेधारकांना दिलासा, वाधवाची इतक्या कोटींची संपत्ती लिलावात ?

पीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे मात्र यासाठी काही काळ लागू शकतो.

Updated: Oct 15, 2019, 07:53 AM IST
पीएमसी बॅंकेच्या खातेधारकांना दिलासा, वाधवाची इतक्या कोटींची संपत्ती लिलावात ?

बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या वाधवाने कर्जाच्या बदल्यात ३५५० कोटींची संपत्ती सुरक्षा अनामत रक्कम म्हणून ठेवली होती. तसेच २५०० कोटींची आणखी संपत्ती सुरक्षा अनामत रक्कम म्हणून ठेवली होती. या संपत्तीचा लिलाव करून पैशांची भरपाई करण्यास वाधवाला हरकत नसल्याचं समोर येत आहे. याबाबत एचडीआयएलच्या विश्वनीय सूत्रांनी माहीती दिली आहे. यामुळे पीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे मात्र यासाठी काही काळ लागू शकतो.

जॉय थॉमसने जुनेत हे नाव बदलून पुण्यात ९ फ्लॅट्स घेतले. ही प्रॉपर्टी नक्की कोणाच्या पैशांनी घेतली ? याचा तपास सध्या EOW करीत आहे. थॉमसच्या दुसऱ्या पत्नीला ७ दिवसात EOW मध्ये हजर राहण्यास ही सांगितले आहे. तीचं माहेर कुर्ल्यात असल्याचं कळतंय. जॉय थॉमसला दुसऱ्या पत्नीकडून एक मुलगा आणि एक दत्तक मुलगी आहे. 

थॉमसच्या म्हणण्यानुसार त्याच्या आणि दुसऱ्या पत्नीच्या वयात ३० वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे हे ९ फ्लॅट आणि एक बुटीक विकत घेतले असल्याचे समोर येत आहे. त्यातील ८ फ्लॅट भाड्याने देण्यात आले. थॉमसला ३ लाख रुपये पगार होता. पीएमसी बँकेने त्याला मर्सिडीज ही दिल्याची माहिती समोर येत आहे. 

या बँकेत दुबईतील एका शेअर होल्डरची माहिती समोर येत आहे. यात हवालाचा पैसा आहे का किंवा आणखी कोणी परदेशातील शेअर होल्डर आहेत का ? याबाबत पोलीस चौकशी करत आहे. 

वरीयम सिंगच्या जुहूतील आणखी एका प्रॉपर्टीची माहिती समोर येत आहे.  त्यात एक संपूर्ण अपार्टमेंट भाड्याने दिल्याचं समोर येत आहे. पण ही मालमत्ता पीएमसीच्या पैशातूनच घेतली हे फॉरेन्सिक ऑडीट रिपोर्ट आल्यानंतरच समोर येईल असं सांगण्यात येत आहे. 

तसेच मनमोहन आहुजा नावाच्या व्यक्तीबरोबर ५ स्टार हॉटेलही भाड्याने दिल्याचं समोर येत आहे याबाबतही मनमोहन आहुजला चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

सारंग वधवांन, राकेश वधवांन, वरीयम सिंग आणि जॉय थॉमस यांच्या अटकेनंतर आता पीएमसीच्या इतर संचालकावर निष्काळजीपणाची कारवाई होऊ शकते. एकूण १३ संचालक या बँकेवर आहेत. त्यांनाही चौकशीला सामोरं जावं लागू शकते. आतापर्यंत या प्रकरणात ३० ते ३५ जणांचे जवाब नोंदविलेले आहे. त्यातील अधिकतर बँकेचे कर्मचारी आहेत.

दररोज नवीन खुलासे होत आहे. आज वधवांन आणि त्यांच्या मुलाला आणि वरीयम सिंग ला १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यानंतर या चौघांची कोठडी ईडी घेऊ शकते.