close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबई अग्निशमन दलात देशातील पहिलाच रोबोट दाखल

 आगीत थेट उडी मारून आगीवर नियंत्रण मिळवणारा अत्याधुनिक रोबो मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल 

Updated: Jul 19, 2019, 07:29 AM IST
मुंबई अग्निशमन दलात देशातील पहिलाच रोबोट दाखल

कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई :  इमारतींमध्ये पसरणाऱ्या आगीची उष्णता आणि धूर यामुळे अग्निशमन दलाला आग विझवताना मोठी अडचण येते. आगीचा भडका उडाल्यानंतर प्रचंड उष्णतेमुळे जवान या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. मात्र आगीत थेट उडी मारून आगीवर नियंत्रण मिळवणारा अत्याधुनिक रोबो मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हा देशातला पहिलाच रोबो आहे.

असा आहे हा रोबो :

या रोबोची किंमत सुमारे १ कोटी रुपये आहे. प्रत्येक रोबोचे वजन सुमारे ४०० ते ५०० किलो आहे. रोबोतील थर्मल कॅमेरा धुरातही सर्व स्पष्ट चित्र दाखवेल. उष्ण तापमानात रोबो स्वत:चे संरक्षण करेल. रोबो बॅटरीवर चालणार असून पाण्याचे पाईप ओढणे, आग विझवणे असे अडथळे दूर करेल. सध्या ईस्त्रायल, चीन, अमेरिका असे रोबो तयार करते. विमान बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियम पत्र्याच्या सहाय्याने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. ७०० अंश सेल्सिअसच्या तापमानातही हा ‘जवान’ काम करू शकणार आहे. फ्रान्सच्या कंपनीने तयार केलेला हा रोबो ५५ मीटर उंचीपर्यंत पाण्याचा मारा करू शकतो. ३०० मीटरपर्यंत त्याचे रिमोटद्वारे नियंत्रण करणे शक्य आहे. यामध्ये कॅमेरा बसविण्यात आला असल्याने घटनास्थळाचाही अंदाज घेता येणार आहे.

आगीत उडी :

मुंबईत उंचच उंच टोलेजंगी इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींना आग लागल्यावर मोठ्या प्रमाणावर पसरणारी आगीची उष्णता आणि धूर यामुळे अग्निशमन दलाला आग विझवताना मोठी अडचण येते. आगीचा भडका उडाल्यानंतर प्रचंड उष्णतेमुळे जवान या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. मात्र अग्निशमन दलात दाखल होणारा हा रोबो आगीच्या ज्वाला, धुराचे लोळ, चिंचोळय़ा गल्ल्या, बेसमेंटची आग अशा ठिकाणी थेट जाऊन आगीवर नियंत्रण मिळवू शकणार आहे. या रोबोवर कॉम्प्युटरच्या माध्यमातून सूचना देऊन काम करून घेतले जाणार आहे. अडगळीच्या ठिकाणी जाऊन हा रोबो  आग विझवू शकणार असल्यामुळे आग भडकण्याचे प्रमाण कमी होणार आहे.