मुंबई: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील चंद्रकांत खैरे यांचा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. यावरून शनिवारी 'सामना'तील अग्रलेखातून या पराभवासाठी कारणीभूत असलेल्या हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यावर अप्रत्यक्षपणे आसूड ओढण्यात आले आहेत.
या अग्रलेखात जाधव आणि रावसाहेब दानवे यांना खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांची उपमा देण्यात आली आहे. ज्यांच्यामुळे औरंगाबादेत शिवसेनेचा पराभव झाला त्या ‘कन्नड’च्या खानासाठी औरंगजेबही कबरीतून अल्लाकडे दुवा मागत असेल. कन्नडच्या खानांसारखे खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ आमच्यातच निपजल्यावर धर्मांधांची विषवल्ली फोफावणारच. औरंगाबाद महापालिकेत नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विजयी खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव येत असताना एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा स्वतंत्र अभिनंदन ठराव घ्यावा हा हट्ट कशासाठी?, असा सवालही शिवसेनेने अग्रलेखातून उपस्थित केला आहे. इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यावरून औरंगाबाद महानगरपालिकेत तुफान राडा झाला होता. यावेळी एमआयएमच्या काही नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर महापौरांनी एमआयएमच्या काही नगरसेवकांचे एका दिवसासाठी निलंबन केले होते.
तसेच लोकसभेत शिवसेनेच्या झालेल्या निसटत्या पराभवामुळे औरंगाबादचा हिंदू नामर्द बनला नाही. ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा असल्याचे सांगत शिवसेनेने एमआयएमवर हल्लाबोलही केला.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत अपक्ष उभे राहिलेल्या जाधव यांना २,८३,७९८ मते पडली होती. हीच मते चंद्रकांत खैरे यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.