मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यातील वाद संपताना दिसत नाहीत. याच पार्श्वभुमीवर चक्क शिवसेना नेत्यानेच आता मुख्यमंत्र्यांआधी राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यातील प्रश्नांबाबत जाऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे विधान काही दिवसांपुर्वी संजय राऊतांनी केले होते. मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्याने शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी राज्यपालांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण विदर्भाच्या प्रश्नासाठी मी राज्यपालांना भेटलो असे तिवारींनी झी २४ तासला सांगितले.
राज्यपालांनी विशेषाधिकार वापरत विदर्भ - मराठवाड्याला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी किशोर तिवारींनी केली. पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली १० हजार कोटींची मदत अपुरी आहे. शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज असल्याचे तिवारी म्हणाले. तिवारी हे गेले काही दिवस मुंबईत आहेत. पण वारंवार मागणी करुनही त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट मिळाली नसल्याची चर्चा आहे. पण असे काही नसल्याचे तिवारी म्हणतायत. मग मुख्यमंत्र्यांआधीच राज्यपालांची भेट का ? असा प्रश्न कायम राहतोय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यानंतर संजय राऊतांनी टीका करत मुख्यमंत्र्यांआधी राज्यपालांची भेट घेणं हा राज्याचा अपमान असल्याचे म्हटले होते. पण आता तिवारींनी राज्यपालांच्या घेतलेल्या भेटीनंतर शिवसेनेत सार अलबेल आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतोय.