मुंबई : शिवस्मारकाच्या पायभरणीच्या शुभारंभासाठी समुद्रात गेलेल्या सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झालाय. सिद्धेश पवार हा सांताक्रुझचा रहिवासी असून तो सीए आहे. ३३ वर्षांच्या सिद्धेशचं गेल्याच वर्षी लग्न झालंय. सिद्धेशचा मामा विक्रांत आमरे हा विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्याच्या सोबत सिद्धेश या कार्यक्रमासाठी गेला होता. मात्र बोटीला अपघात झाला आणि सिद्धेशचा यात मृत्यू झाला. त्याचा मामा विक्रांत आमरेही या अपघातात जखमी झालाय. विक्रांत आमरेला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सिद्धेश हा मूळचा खेड तालुक्यातल्या गुणदेचा आहे.
शुभारंभासाठी तीन बोटी नियोजित स्मारकाच्या दिशेनं निघाल्या होत्या. मात्र एका बोटीचा चालक अतिशय वेगानं बोट चालवत होता. या बोटीत २५ जण होते. मात्र वेगानं जाणाऱ्या या बोटीवरील नियंत्रण सुटल्यानं ही बोट खडकावर आदळली. बोट तुटल्यामुळे बोटीत पाणी शिरलं आणि सर्वांनी आपापले प्राण वाचवण्यासाठी धावपळ केली.
या बोटीला अपघात झाल्यानंतर श्रीनिवास जोशी य़ांनी शेकापचे अध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांना संपर्क केला. त्यानंतर जयंत पाटलांनी मदतीसाठी काही बोटी अपघातस्थळी पाठवल्या. बोटीत कोणत्याही प्रकारचे जीवरक्षक आणि लाईफ जॅकट नव्हते असा आरोप काही प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी केली आहे. मात्र या सर्व बोटींमध्य़े सुरक्षेच्या सर्व सोयी असल्याचा दावा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलाय.