ST Bus Strike : सत्तेसाठी पावसात भिजले, पण आज... सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजप नेत्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे

Updated: Nov 18, 2021, 07:21 PM IST
ST Bus Strike : सत्तेसाठी पावसात भिजले, पण आज... सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा title=

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 10 दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच संप सुरु आहे. मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले असून भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या संपाचं नेतृत्व करत आहेत. आज गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीनंतर बोलताना गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 

शरद पवार यांच्यावर निशाणा
शरद पवार म्हणतात संपावर मध्य मार्ग काढू, पण पवारांचा मध्य मार्ग नेमका कुठे आहे हे कधीच कळू शकलेलं नाही. सत्तेवर येण्यासाठी पवार साहेब पावसात भिजले, पण काल एसटी कर्मचारी पावसात भिजले, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पवारांना दिसले नाहीत हे राज्याचं दुर्देव असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. 

सरकार निलंबनाची भीती दाखवतंय
गेल्या 10 दिवसांपासून एसटी कर्मचारी आझाद मैदानात बसलेले आहेत, पण सरकार सकारात्मक निर्णय घ्यायला तयार नाहीत, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. जोवर विलीनीकरण होत नही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे. काल एका तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली हे दुर्देवी आहे. सरकार निलंबनाची भीती दाखवत आहे. असं पडळकर यांनी म्हटलं आहे. 

शरद पवारांनी घात केला
या कर्मचाऱ्यांचा शरद पवार यांनी घात केला. त्यांची एकमेव संघटना मान्यताप्राप्त आहे, आणि राज्य सरकार त्याच मान्यताप्राप्त संघटनेशी चर्चा करत आहे. मात्र या संघटनेने मूळ विषय कधी सरकारकडे मांडले नाहीत, असा आरोप पडळकर यांनी केला आहे. तसंच शरद पवारांनी 1980 ला जे भाषण केलं ते भाषण आजही करत आहेत, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.