मुंबई : राज्यात कोविड-१९ चा मोठा प्रादुर्भाव होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्यात जेथे शक्य आहे त्याठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत आणि येत आहेत. कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र करताना इतर आजारांकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे. अनेकांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने खासगी दवाखाने सुरु करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अनेक ठिकाणी खासगी दवाखाने अजुनही बंद आहेत. खासगी दवाखाने बंद ठेवले तर कारवाई करण्यात येईल असा इशाराही राज्य सरकारने दिला आहे. आता पुन्हा एकदा खासगी दवाखाने सुरु करा, असे आवाहन करताना खासगी डॉक्टरांना पीपीई किट देण्यात येईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासण्यासाठी आपले दवाखाने सुरु करावेत, असे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आवाहन केले आहे. पीपीई किट आणि एन ९५ मास्क याचा आवश्यक पुरवठा करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान दहा केमिस्टच्या दुकानांमधून पीपीई किट आणि एन ९५ मास्क विक्रीस ठेवण्याची मान्यता देण्यात आली आहे. कोरोना या आजारा व्यतिरिक्त इतर रुग्ण तपासण्यासाठी खासगी दवाखाने सुरु ठेऊन रुग्ण सेवा करावी, असेही डॉ. शिंगणे यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, प्लाज्मा थेरपीच्या परवानगीसाठी औषध प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या उपचारासाठी प्लाज्मा थेरपीच्या परवानगीसाठी केंद्राकडून लागणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने मिळवून देण्यात औषध प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन सर्व परवानगी केवळ दोन दिवसात मिळवून दिल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. ही परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल उपस्थित रक्तपेढी चालकांनी अधिकाऱ्याचे यावेळी आभार मानले.