निलंबित राज्यसभा खासदारांसाठी पवार मैदानात, अन्नत्याग करण्याचा निर्णय

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज उपोषण करणार

Updated: Sep 22, 2020, 02:06 PM IST
निलंबित राज्यसभा खासदारांसाठी पवार मैदानात, अन्नत्याग करण्याचा निर्णय title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : निलंबित राज्यसभा खासदारांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज उपोषण करणार आहेत. राष्ट्रवादीने शेतकरी विधेयकांना विरोध करण्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे. आज कितीही जाहिराती दिल्या तरी उपाध्यक्षांची सदनाकडे बघण्याची भूमिका अवमूल्यन करणारी आहे. हरिवंश यांच्या संसदेतील वागण्याची बिहारच्या लोकांना चिंता वाटली असेल असेही पवार म्हणाले. 

ही विधेयके एका झटक्यात समंत करण्याची गरज नव्हती. एका विधेयकाने कार्पोरेट क्षेत्राला कुठेही जाउन शेत माल विकत घेण्याचा अधिकार दिलाय. शेतमाल कुठेही विकायला पूर्वीपासून परवानगी आहे. कोकणातला हापूस, नाशिकची द्राक्ष कुठेही विकता येतात. शेतमाल बाजार समित्या करतात, तिथे आधारभूत किंमत मिळते. पण आधारभूत किंमतीबाबत कायद्यात उल्लेख केला नसल्याचा पवारांनी केला.

एकीकडे मार्केट खुले आहे सांगता मग कांदा परदेशात पाठवायला बंदी का घालता ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आज जे सकाळ, दुपार निर्णय घेतले जातात. त्याबाबत परिणाम बाहेरच्या देशातील आपल्या विश्वासहर्तेवर होतोय. बांगलादेशने कांदा निर्यात बंदी बाबत नापसंती व्यक्त केली. आंतर्राष्ट्रीय बाजारात परिणाम होत असल्याचे पवारांनी म्हटले. 

राज्यसभेतील विरोधी पक्षाचे खासदार उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांना वारंवार नियमाचे पुस्तक दाखवत होते. पण उपसभापतींनी त्याकडे दुर्लक्ष केले. खासदार नियमाचे पुस्तक दाखवत असताना उपसभापतींनी त्यांचे ऐकायला पाहिजे होते. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत उपसभापतींनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेतले. 

उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्याकडून मला अपेक्षा होत्या. मात्र, त्यांचे वागणे बघून मला धक्का बसला. उपसभापतींकडून विचारांना तिलांजली देण्याचे काम झाले, अशी टीका शरद पवार यांनी केली. तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या उपसभापतींनी सभागृहात नियमांना महत्त्व दिले नाही, ते निलंबित सदस्यांना चहापान द्यायला गेले. मात्र, सदस्यांनी त्यांच्या चहापानाला हात लावला नाही, याचा आपल्याला अभिमान असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्याविषयीचा आपला अंदाज सपशेल चुकल्याची कबुलीही शरद पवार यांनी दिली. तसेच निलंबित खासदारांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचेही शरद पवार यांनी जाहीर केले.

...म्हणून मी राज्यसभेत गेलो नव्हतो- शरद पवार

राज्यसभेत कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी आपण का हजर नव्हतो, याचे स्पष्टीकरणही शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत दिले. मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीबद्दल मी गेले दोन दिवस राज्य सरकारशी चर्चा करत आहे. मी अनेक कायदे तज्ज्ञांबरोबरही बोललो. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर अपील करणे गरजेचे आहे. त्यासाठी मला मुंबईत थांबावे लागले आणि दिल्लीला जाता आले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.