Teachers day 2022 : 'शासन दरबारी गाऱ्हाणी मांडूनही फायदा नाही', शिक्षकांची ही अवस्था पाहून डोळ्यात पाणी येईल

Teachers day 2022 : एका शिक्षिकेचे हे शब्द, सरकारला जागं करणार का? 

Updated: Sep 5, 2022, 10:38 AM IST
Teachers day 2022 : 'शासन दरबारी गाऱ्हाणी मांडूनही फायदा नाही', शिक्षकांची ही अवस्था पाहून डोळ्यात पाणी येईल  title=
Teachers day 2022 blog questions and Difficulties of being teacher

प्रा. शिल्पा निलेश हुमे, मुंबई : प्रत्येक देशाच्या विकासात शिक्षकाचा अनन्यसाधारण वाटा असतो. शिक्षक हे नेहमी प्रतिभावंत विद्यार्थी बनवण्याचे काम करतात. गुरु-शिष्य परंपरा लाभलेल्या भारतात आणि विशेषतः पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षकांविषयी गैरसमज पसरवण्याचे काम चालू असलेले पाहायला मिळते. नानाविध तज्ज्ञांनी शिक्षणाचे महत्त्व वेळोवेळी पटवून दिले आहे. शिक्षणामुळे व शिक्षकांमुळे समाज नेहमी सुस्थितीत पाहायला मिळतो. (Teachers day 2022 blog questions and Difficulties of being  teacher )

शिक्षणामुळे मिळणाऱ्या स्थैर्यातून आणि शांतीतून समाजाची नेहमीच प्रगती होत असते. जिथे शिक्षण जास्त असते तिथे गुन्हे नेहमीच कमी प्रमाणात असतात. जसे व्हिक्टर हुगो म्हणतो, " He who opens school door closes a prison." आणि शिक्षणाची कवाडे उघडे करण्याचे काम हे शिक्षकच करत असतो. 

प्राचीन काळी गुरुकुल परंपरा अस्तित्वात होती. ज्यामध्ये शिष्य हा गुरुच्या निवासस्थानी किंवा आश्रमात जाऊन शिक्षणाचे धडे गिरवायचा. काळानुरूप याच्यात बदल होत गेले. शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांना देवासमान स्थान होते. परंतु आजच्या घडीला काही लोक उठ सूट शिक्षकांविषयी बोलत असतात. माझ्या मताप्रमाणे प्रामाणिकपणा आणि शिक्षक हे दोन्हीही समानार्थी शब्द आहेत. 

आजच्या घडीचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शेतकऱ्यांची मुले शिकताना पाहायला मिळतात. शिक्षक हे नेहमीच विद्यार्थ्यांना पोटतिडकीने शिकवत असतात परंतु त्यांच्या तितक्याच समस्याही आहेत. 

शासन दरबारी वारंवार गाऱ्हाणी मांडूनही फायदा होत नाही किंवा त्यांनी उठवलेल्या आवाजाकडे कोणीच लक्ष देत नाही. शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा खूप आहे. कोरोना काळामध्ये तर अक्षरशः शिक्षकांना रेशन दुकानावरती बसवणे, टोल नाक्यावरती बसवणे, चेक नाक्यावरती बसवणे, एवढेच नाही तर दारूच्या दुकानावरही शिक्षकांना काम दिलेले पाहायला मिळाले. 

शिक्षक प्रामाणिकपणे समाज घडवण्याचे काम करत असतात. तरीही त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी शंका उपस्थित केल्या जातात. बऱ्याच कार्यालयांमध्ये अगदी शिपायापासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत भ्रष्टाचार झालेला पाहायला मिळतो. गावच्या ठिकाणी गरीब शेतकऱ्यांचे सुद्धा मोठी आर्थिक पिळवणूक झालेली दिसते. 

बऱ्याच ठिकाणी टक्केवारी किंवा कमिशन ठरलेले असते.  कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेली उदाहरणे आपल्याला विविध समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले पाहायला मिळतात.  ज्यांना जास्त पगाराची किंवा पेन्शनची आवश्यकता नाही त्यांच्यावरती पैशाची उधळपट्टी झालेली पाहायला मिळते. याचा विचार कोणीच करत नाही.  

प्रत्येक क्षेत्राचा आपण जर चिकित्सक अभ्यास केला तर आपल्याला या ना त्या कारणाने ते बदनाम झालेले पाहायला मिळते. यातील सगळेच भ्रष्टाचारी किंवा अप्रमाणिक आहेत असे मी म्हणणार नाही. बरेचसे नेते आणि अधिकारी प्रामाणिकही असतात आणि त्यामुळेच सर्व व्यवस्था सुरळीत चालू असते. 

वाचा : 'एकनाथ शिंदेंसाठी काहीही करु शकतो'; चित्रपट दिग्दर्शकाची भावनिक पोस्ट

 

याउलट शिक्षक कोणता भ्रष्टाचार करतात? त्यांची पगाराव्यतिरिक्त इतर कमाई काय आहे? त्यांचे कमिशन किंवा टक्केवारी ठरलेली असते का? विनाअनुदानित शिक्षक बांधव तर घरादाराचा विचार न करता पोटतिडकीने ग्रामीण भागात तसेच शहरी भागात आपल्याला शिकवताना पाहायला मिळतात. काहीजण अगदी निवृत्त होण्याच्या उंबरठ्यावरती आहेत. त्यांना ग्रामीण भागातील मजुरांपेक्षाही कमी मानधन मिळते. 

(School) शाळांच्याही विविध समस्या आहेत. वर्ग खोल्या पुरेशा नाहीत. सोयी सुविधांचा अभाव, पाणी नाही, वीज नाही, शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत मग समाजाची प्रगती होणार कशी? याचे दूरगामी परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 

शिक्षक भरती वेळोवेळी झाली तर... (Teachers recruitment)
जर शिक्षक भरती वेळोवेळी झाली नाही, विनाअनुदानित धोरण हटवले नाही तर समाजाचे अध:पतन येत्या पंधरा ते वीस वर्षात निश्चित आहे. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला सांगितले आहे 'विद्येविना मती गेली....' बाकी तुम्ही सुज्ञ आहात. 

आधुनिक शिक्षणाचे कास जोपासण्यासाठी लागणाऱ्या संसाधनांचा अभाव आहे. मग याला जबाबदार कोण? विशिष्ट भागातील लोकप्रतिनिधी की शिक्षक? जे लोकप्रतिनिधी शिक्षकांच्या विरोधात बोलतात त्यांच्या मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज, सरकारी शाळा, शेतकऱ्यांची अवस्था सर्व सुज्ञ नागरिकांनी एकदा नक्की पहावी. 

असे नेहमी म्हटले जाते की शिक्षक खूप पगार घेतात. चार चाकी गाडीतून शाळेमध्ये शिकवायला येतात. माझा हे प्रश्न उपस्थित करणाऱ्या वर्गाला प्रश्न आहे की, शिक्षकांनी का येऊ नये चारचाकी गाडीत? का बांधू नयेत बंगले? शिक्षकांना भ्रष्टाचारी म्हणणाऱ्यांचा किंवा त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास कमी झालेला आहे असे वाटते. 

जवळजवळ नव्वद टक्के शिक्षक हे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे मिळणारा पैसा हा शेतकऱ्यांच्या घरात जातो आणि अर्थव्यवस्थेचे चक्र नियंत्रण चालू राहते. याउलट मी तर म्हणेन शासनाने शैक्षणिक सोयी-सुविधांवरती भर देण्याची गरज आहे, विनाअनुदानित धोरण हटवण्याची गरज आहे, संच मान्यतेचे निकष बदलण्याची गरज आहे आणि महत्त्वाचे म्हणजे अनुदानित धोरण कायम राखणे गरजेचे आहे जर गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे असे आपल्याला वाटत असेल तर... शिक्षकांचे पगार हे जास्त असणे तसेच करमुक्त असणे महत्त्वाचे आहे. यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे अर्थशास्त्र दडलेले आहे. काही चांगल्या लोकांमुळे पृथ्वीचा समतोल टिकून आहे. त्यात शिक्षकांचे स्थान हे सर्वोच्च आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांच्या हाती देशाचे भविष्य आहे. कारण शिक्षक हे भावी (Engineer, Doctor, scientist, writer) इंजिनिअर, डॉक्टर, शास्त्रज्ञ, लेखक, खेळाडू तसेच इतर विविध क्षेत्रात प्रगती करणारी सामर्थ्यवान पिढी घडवत असतात.