मुंबई : कोविड 19 आजारावरील सीरम इन्स्टिट्यूटच्या 'कोविशील्ड' या लसीचा पहिला साठा मुंबईमध्ये दाखल झालाय.बीएमसीच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. मनपाच्या परळ येथील F- दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचलाय.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस बीएमसीला मिळालेत. F- दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे मुंबईतही 16 जानेवारीला लसीकरण शक्य आहे. मुंबईतील परेल इथल्या कार्यालयात सध्या या लस ठेवण्यात आल्या आहेत.
(Corona vaccine) पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटमधून (Serum Institute) आज देशभरात कोरोनाची लस रवाना झाली. या लसीसाठी सीरम इन्स्टिट्यूटमधल्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. पुढच्या महिन्या दोन महिन्यांत तुमच्या घरात कोरोनाची लस घेण्याची तयारी सुरू होईल. या कोरोनाच्या लसीसाठी तुम्हाला किती पैसे राखून ठेवायचे आहेत.
सीरमची लस सरकारला ना नफा ना तोटा तत्वावर मिळणार आहे. सीरमची लस सरकारला सवलतीच्या दरात म्हणजे 210 रुपयांना मिळणार आहे. सरकारसाठी सीरमनं साडे चार कोटी लसी राखून ठेवल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 2 कोटी कोव्हीड योद्ध्यांना लस मोफत मिळेल. त्यानंतरच्या टप्प्यात पन्नास वर्षांवरच्या आणखी दीड कोटी लोकांना ही लस देण्यात येईल. सर्वसामान्यांना लस 1 हजार रुपयांना मिळणार आहेसर्वसामान्यांपर्यंत ही लस पोहचण्यासाठी जून महिना उजाडण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्यापर्यंत साधारण साडे चार कोटी भारतीयांपर्यंत लस पोहोचलेली असेल. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची किंमत किती असेल, याबद्दल अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. रशियन बनावटीची 'स्पुटनिक 5' ही लस बनवण्याचा परवाना भारतीय कंपनी डॉ. रेड्डीजला मिळाला आहे. शिवाय गुजरातमधल्या कडिला हेल्थ केअरच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या सुरु आहेत.
त्यामुळे सीरमची लस सर्वसामन्यांना पोहचेपर्यंत इतर कंपन्यांच्या लसीही बाजारात आलेल्या असतील. त्यामुळे इतर कंपन्यांच्या लसींशी किंमतीशी स्पर्धा करतानाही किंमत आणखी कमी होण्याचीच शक्यता आहे.