गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत कालपासूनच मुसळधार सुरु आहे. नागरिकांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. पण या पावसात होणाऱ्या दुर्घटनांच्या संख्येत प्रत्येक मिनिटाला वाढच होताना दिसत आहे. या मुसळधार पावसाने मालाडमध्ये दोघांचा बळी घेतला आहे. मालाडच्या सबवेमध्ये पावसामुळे गाडीत गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला आहे.
मालाडच्या सबवेमध्ये पाणी भरले होते. याठिकाणी जाऊ नका अशी सुचना देण्यात आली होती. तरीही नागरिक या रस्त्याने जात होते. तसेच वाहन चालक देखील आपली वाहने या रस्त्यावरुन नेत होते. पण पाऊस न थांबल्याने गाडी सबवे मध्ये अडकून राहीली. बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने आतील दोघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची माहीती समोर येत आहे.
अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे.