'शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचलं' उद्धव ठाकरेंचं भाषण जसंच्या तसं

मविआ सरकार कोसळलं, उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाबरोबरच विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा

Updated: Jun 29, 2022, 10:00 PM IST
'शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचलं' उद्धव ठाकरेंचं भाषण जसंच्या तसं title=

Uddhav Thackeray Live : राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा (maharashtra political crisis) भूकंप घडला आहे. राज्यातील सत्तानाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा (Cm Uddhav Thackeray Resign) राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्द्वारे जनतेशी संवादादरम्यान हा मोठा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या भाषणातही उद्ध ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांबाबत नराजी व्यक्त केली. शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन  खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार आहे, शिवसैनिकांची सेवा करणार आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. 

उद्धव ठाकरे यांनी भाषणात काय म्हटलं?
शिवसेनेला 56 वर्ष झाली. लहानपणापासून मी शिवसेना काय आहे हे नुसतं बघत नाही तर अनुभवत आलो आहे. साधी साधी माणसं कोण रिक्षावाले, कोण टपरी वाले, अगदी हातभट्टीवालेसुद्धा, त्यांना शिवसेनाप्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणलं. नगरसेवक बनवलं, महापौर बनवलं, आमदार बनवलं, खासदार झाले मंत्री झाले, मोठी झाली माणसं.

पण मोठं झाल्यावर ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांनाच विसरायला लागले.  ज्यांना आजपर्यंत मोठं केलं, ज्यांना सत्ता आल्यानंतर जे काही शक्य होतं ते सगळं दिलं, ती लोकं नाराज झाली. 

मातोश्री आल्यानंतर साधीसाधी माणसं भेटायला येत आहेत. साहेब आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असं सांगतायात, म्हणजे ज्यांना दिलं ते नाराज आणि त्यांना काही दिलं नाही ते हिमतीने सोबत आहेत. याला म्हणतात माणूसकी, याला म्हणतात शिवसेना, याला म्हणतात शिवसैनिक. 

याच नात्याच्या जोरावर शिवसेना उभी आहे. जी आव्हानं आली ती शिवसैनिकांच्या साथीने परतवत आली आहे. आता न्यायदेवतेने निकाल दिला आहे. आपण आपली बाजू मांडलेली आहे. उद्या फ्लोअर टेस्ट करण्याचा राज्यपालांनी आपल्याला जो आदेश दिलेला आहे, तो आदेश त्याचं पालन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

राज्यपालांचे धन्यवाद मानायचे आहेत, आपण लोकशाहीचा मान राखलात. आपल्याकडे काही जणांनी पत्र दिलं. आपण तातडीने चोवीस तासाच्या आत आम्हाला फ्लोअर टेस्ट करायला सांगितली. लोकशाहीचं पालन झालंच पाहिजे, आम्हीही करणार, ते झालंच पाहिजे, पण जवळपास दीड दोन वर्ष  विधानपरिषदेच्या बारा सदस्यांची यादी जी आपल्याकडे लटकून राहिलेली आहे ती सुद्धा तातडीने मंजूर केली तर आपल्याबद्दल जो आदर आहे, तो द्विगुणित होईल. 

जे दगा देणार असं सांगितलं जात ते सोबत राहिले, आजसुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अशोक चव्हाण मला म्हणाले, आपला काँग्रेस-राष्ट्रवादीवर राग असेल तर आण्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, बाहेरुन पाठिंबा देतो. 

आज नामांतर केल्यानंतर मी हिंदुत्व सोडंल असं तुम्हाला वाटत असेल तर यापुढे आणखी काय करु. पण आपली नाराजी सुरतला आणि गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्रीवर येऊन का नाही सांगितलं की आम्हाला बोलायचं आहे, मी बोललो असतो. 

उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना आवाहन
उद्या केंद्रीय राखीव दल मुंबईत येणार आहे, लष्करही येईल. उद्या कोणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नका, सर्वांना येऊ द्यावं. लोकशाहीचा पाळणा उद्या हालणार आहे. उद्या तुमच्या वाटेत कोणीही येणार नाहीत, फ्लोअर टेस्टसाठी या. शिवसैनिकांना आवाहन आहे की उद्या कोणीही गोंधळ घालू नये असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.