वडिलांचा मृतदेह चार दिवसांपासून घरात ठेवला लपवून, धक्कादायक कारण आलं समोर

नैराश्येतून एका मुलीची आत्महत्या, तर दुसऱ्या मुलीला आत्महत्या करताना नागरिकांनी वाचवलं

Updated: Aug 4, 2021, 09:13 PM IST
वडिलांचा मृतदेह चार दिवसांपासून घरात ठेवला लपवून, धक्कादायक कारण आलं समोर

विरार : कुटुंबातल्या सदस्याचा मृतदेह तब्बल चार दिवस घरातच लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये उघडकीस आला आहे. विरार पश्चिममधल्या गोकुळ टाऊनशिप इथल्या ब्रोकलीन या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या 72 वर्षीय हरिदास सहरकर यांचा राहत्या घरी 1 ऑगस्टला मृत्यू झाला होता. कुटुंबात पत्नी आणि दोन अविवाहित मुली असा परिवार आहे. 

हरिदास यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा समज करून क्वारंटाईन व्हावं लागेल या भीतीपोटी घरच्या इतर सदस्यांनी हरिदास यांचा मृतदेह अंत्यसंस्कार न करता घरातच लपवून ठेवला. तब्बल चार दिवस मृतदेह घरात होता. 

पण नैराश्यातून हरिदास यांच्या एका मुलीने अर्नाळा समुद्रात आत्महत्या करून आपले जीवन संपविलं. मात्र त्या मृतदेहाची ओळख पटली नसल्याने पोलीस शोध घेत होते. 

आज दुसऱ्या मुलीनेही आपले जीवन संपविण्याचा प्रयत्नात समुद्रात उडी घेतली. पण समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांच्या  आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलीचे प्राण वाचविण्यात यश आलं. त्यानंतर मुलीच्या चौकशीतून हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. 

दरम्यान या घटनेची नोंद अर्नाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.