मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांसह पालकांनीही नाराजी व्यक्त केली होती. शाळा पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. यानंतर आता राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
शिक्षण विभाग आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव मांडणार आहे. शाळांपाठोपाठ राज्यातील महाविद्यालये सुरू होण्याचेही संकेत मिळत आहेत. कॉलेज सुरु करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभाग सकारात्मक आहे. यासंदर्भातही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महाविद्यालये सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाला अंतिम मंजूरी घेतली जाणार आहे.
गेले काही दिवस राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. तसंच ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात सर्वाधिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
त्यामुळे राज्यातील शाळा-महाविद्यालय सुरु करण्याबाबत दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे शिक्षणविभागही शाळा-महाविद्यालय सकारात्मक आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांचं लक्ष या निर्णयाकडे लागलं आहे.