www.24taas.com, रांची
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चारा घोटाळ्यातील ४१ दोषींना चार ते सात वर्षांची सक्त मजुरी आणि दोन ते तीस लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.के.सिंग यांनी सजा सुनावली.
चारा घोटाळ्यात ७३ आरोपी दोषी ठरले त्यापैकी नऊ जणं खटला चालु असताना मरण पावले तर तिघेजण सीबीआयचे साक्षीदार झाले. न्यायालयाने सोमवारी ६१ जणांना दोषी ठरवलं आणि त्यापैकी २० जणांना एक ते तीन वर्षे कारावासाची सजा सुनावली तसंच ३०,००० ते ३ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला. उर्वरित ४१ जणांना बुधवारी सजा सुनावण्यात आली.
सीबीआयने २००१ साली आरोपपत्र दाखल केलं होतं आणि २००४ साली आरोप निश्चित केले होते.
पशु पालन खात्याशी संबंधित काही शे कोटी रुपयांचा चारा घोटाळा नव्वदच्या दशकात उघडकीस आला, त्यावेळेस झारखंड हा बिहार राज्याचा भाग होता. चारा घोटाळ्यात ६१ खटले दाखल करण्यात आले आणि त्यापैकी ५३ खटले झारखंडला हस्तांतरित करण्यात आले. झारखंड हे २००० साली स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं. आता पर्यंत सीबीआय न्यायालयाने ३९ खटल्यांमध्ये निकाल दिला आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालु प्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा हे पाच खटल्यांमध्ये आरोपी आहेत. त्यांचे खटले वेगवेगळ्या सीबीआय न्यायालयात प्रलंबित आहेत.