www.24taas.com, नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा ल्यूक पॉमर्सबॅच आणि सिद्धार्थ माल्या या दोघांना आता चांगलाच दिलासा मिळालाय. कारण, अमेरिकन महिला जोहल हमीद हिनं या दोघांवर दाखल केलेले खटले मागे घेण्याचा निर्णय घेतलाय.
१७ मे रोजी ल्यूक पॉमर्सबॅचनं जोहल हमीद यानं आपली छेडछाड केल्याचा आरोप हमीदनं केला होता. एका हॉटेलमध्ये झालेल्या आरसीबीच्या पार्टीत जेवत असताना ल्युकने आपल्याला व आपल्या बॉयफ्रेंडला मारहाण केल्याचा आरोप जोहलनं केला होता. याबद्दल पोलिसांनी पॉमर्सबॅचला अटकही केली होती. पण, आता जोहलनं आपला विचार बदललाय. दोन्ही पक्षांचं कोर्टाबाहेर झालेल्या चर्चेनंतर जोहलनं हा निर्णय घेतलाय.
लवकरच, जोहलच्या वकिलांकडून पॉमर्सबॅचविरुद्धची तक्रार मागे घेण्याचा अर्ज दिल्ली उच्च न्यायालयात सादर केला जाईल. गेल्या शुक्रवारी १८ मे रोजी पॉमर्सबॅचला अटक झाली होती आणि नंतर त्याला जामीनही मिळाला होता. पॉमर्सबॅचसोबतच जोहल सिद्धार्थ माल्याविरुद्ध केलेली अब्रुनुकसानीची तक्रारदेखील मागे घेणार आहे. रात्री उशीरा सिद्धार्थ माल्यानं केलेल्या ट्विटरवर याबद्दलचा आपला आनंद व्यक्त केलाय. तो म्हणतो, ‘सगळे आरोप मागे घेतले गेलेत. याबद्दल खूप आनंद झालाय. आता ल्यूक एका स्वतंत्र माणसासारखा फिरू शकतो.’