www.24taas.com, छत्तीसगड
छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अँलेक्स पॉल मेनन यांचे अपहरण करून नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांना आव्हान दिलं आहे. नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्याचं विभाजन करून छत्तीसगड सरकारने नुकताच सुकमा हा नवा जिल्हा निर्माण केला आहे.
मेनन हे जिल्ह्याचे पहिलेच जिल्हाधिकारी आहेत. छत्तीसगड सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांना नक्षल चळवळीतून बाहेर आणण्यासाठी 'ग्राम सुराज ' नावाची धडक योजना सुरु केली आहे. या योजनेत शासकीय अधिकारी आणि नेते थेट अतिदुर्गम भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधतात. केरलपाल क्षेत्रातील माझीपडा गावात अशीच एक सभा आयोजित केली गेली होती.
या सभेला जिल्हाधिकारी मेनन एका दुचाकीवरून गावात पोचले होते. सभा सुरु असतानाच अचानक नक्षलवाद्यांनी सभेला घेराव घालत अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सर्वप्रथम मेनन यांच्या शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांना गोळ्या घालून ठार केले. यानंतर लगेच जिल्हाधिकारी मेनन यांना नक्षली आपल्यासोबत घनदाट जंगलात घेऊन गेले.