www.24taas.com, जम्मू
पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मिरातील नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे. पाक लष्कराने पुँछ येथील कृष्णा घाटी भागात भारतीय छावणीवर गोळीबार केल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली. गोळीबार हा दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्यासाठी मदतीचा भाग असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.
जम्मूपासून २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णा सेक्टर भागातील क्रांती आणि किरपान या पोस्टवर पाकिस्तानी लष्कराने बेछुट गोळीबार केला.
भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. ही चकमक सुमारे ९० मिनिटे सुरू होती. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.
भारत आणि पाकिस्तानने २००३मध्ये शस्त्रसंधी केली होती. त्यानंतर २००५ पासून पाकने अनेकवेळा या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.