www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचा पेटारा आज उघडणार आहे. आगामी वर्षासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्प प्रणवदा सादर करतील. या पेटाऱ्यातून अर्थमंत्री कोणाला काय देणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. वैयक्तीक आयकर मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे. मात्र अर्थमंत्री ही शिफारस अंमलात आणतील का याबाबत साशंकता आहे.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना वेगळी सूट देण्यात येईल का याबाबतही उत्सुकता आहे. आर्थिक तुटीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री काही कठोर निर्णय घेण्याचीही शक्यता आहे. ऐषोआरामाच्या वस्तूंवरील करात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. मणिपूर वगळता इतर चार राज्यातल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
त्यामुळे जनताविरोधी अर्थसंकल्प सादर करुन त्यांच्या रोषाला सामोरं जाण्याचा धोका अर्थमंत्री स्वीकारण्याची शक्यता फार कमी आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा विरोध लक्षात घेऊन विमा तसेच रिटेल क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीवर माघार घेतली जाण्याची शक्यता आहे. प्रणवदांनी आतापर्यंत सहा अर्थसंकल्प सादर केले असून आज ते आपला सातवा अर्थसंकल्प सादर करतील.
[jwplayer mediaid="66269"]