माझ्या पतीच्या जीवाला धोका- श्वेता भट

आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट यांनी पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, आपल्याला कालपासून पतीला भेटू दिलं जात नाहीय, फक्त मलाच नाही तर संजीव भट यांच्या वकिलांनाही त्यांना भेटू दिलं जात नाही.

Updated: Oct 9, 2011, 01:03 PM IST

झी २४ तास वेब टीम, अहमदाबाद 

 

गुजरातचे आयपीएस अधिकारी संजीव भट यांना अटक केल्यानंतर आज त्यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या जीवाला धोका असल्याचा आरोप पोलिस महासंचालकांना पत्र लिहून केलाय. गुजरातमध्ये आपल्या पतीला न्याय मिळू शकत नसल्याचंही तिने आपल्या पत्रात म्हटलंय.

 

आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट यांनी पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, आपल्याला कालपासून पतीला भेटू दिलं जात नाहीय, फक्त मलाच नाही तर संजीव भट यांच्या वकिलांनाही त्यांना भेटू दिलं जात नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या जामीनासाठी तरी कसा अर्ज करावा, अशी विचारणाही या पत्रातून करण्यात आलीय.

 
संजीव भट यांचे सहकारी असलेले कॉन्स्टेबल के डी पंत यांनी त्यांच्याविरूद्ध एफआयर दाखल केल्यानंतर त्यांना काल अटक करण्यात आली होती. मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांनी 27 फेब्रुवारी 2002 साली बोलावलेल्या बैठकीला उपस्थित असल्याचं शपत्रपत्र लिहिण्यासाठी आपल्याला धवकावणी केल्याचा आरोप केडी पंत यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर भट यांना तातडीने अटक करण्यात आली होती.

 

संजीव भट हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांविरूद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर घाटलोडिया पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करून क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आल्याचा आरोपही श्वेता भट यांनी केलाय. भट यांना अटक केल्यानंतर तब्बल तीस ते चाळीस पोलिसांनी आपल्या घराची झडती घेतली. कोणत्याही सर्च वॉरन्टशिवाय तब्बल दोन तास हे झडती सत्र सुरू असल्याची टीकाही श्वेता भट यांनी केलीय. संजीव भट यांना पोलिसांनी अटक केल्यापासून त्यांच्याशी आपला कसलाच संपर्क होऊ शकलेला नाही, असंही श्वेता भट यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय.

 

राज्याचे पोलिस महासंचालक चित्रांजन सिंह यांच्याप्रमाणेच अहमदाबादचे पोलिस आयुक्त सुधीर सिन्हा आणि स्थआनिक कोर्टाचे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनाही श्वेता भट यांनी आपल्या पत्राच्या प्रति पाठवल्या आहेत.

Tags: