www.24taas.com, नवी दिल्ली
प्रणव मुखर्जी अखेर भारताचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी एनडीएचे उमेदवार पी. ए. संगमांचा पराभव केला. मुखर्जींच्या रुपानं राष्ट्रपतीपदाचा मान पहिल्यांदाच बंगालला मिळालाय.
प्रणवदांच्या विजयात महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातून प्रणवदांना तब्बल 225 मतं मिळाली. तर संगमांना अवघी 47 मतं मिळाली. भाजपशिवाय इतर सर्व पक्ष आणि अपक्षांची मते प्रणवदांना मिळाली आहेत. भाजपशासित कर्नाटकातही भाजपला दणका बसलाय. भाजपच्या जवळपास 17 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. तिथं 117 मतं प्रणवदांना, तर 103 मतं संगमांना मिळाली. केरळमध्ये तर संगमांना एकही मत मिळालं नाही. तर ईशान्येकडच्या अरुणाचल प्रदेशातूनही संगमांना अवघी तीन मतं मिळाली. 25 जुलै रोजी प्रणवदा राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत.
काँग्रेसअध्यक्ष सोनिया गांधींनीही प्रणव मुखर्जींच अभिनंदन केलयं. सोनिया गांधीनी राहुल गांधींसोबत प्रणव मुखर्जींच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं अभिनंदन केलंय. याशिवाय पंतप्रधानांनीही प्रणव मुखर्जी यांचं अभिनंदन केलंय.