www.24taas.com, गडचिरोली
ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्कार शिकवणं अपेक्षित आहे. त्यांनीच शाळेतील संगणकावर विद्यार्थ्यांना अश्लील चित्रफीत दाखवण्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीतील एका दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला आहे.
गडचिरोलीतील जिल्हा परिषदेची उच्च माध्यमिक शाळा. शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेतला एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळा सुटल्यानंतर एक विद्यार्थी काही कारणानं पुन्हा शाळेत परतला. संगणक कक्षात काही शिक्षक संगणकावर विद्यार्थ्यांना अश्लील चित्रफीत दाखवत असल्याच त्याला दिसून आलं. पहिल्या दिवशी या विद्यार्थ्यानं झाला प्रकार कुणाला सांगितला नाही मात्र दुसऱ्या दिवशीही असाच प्रकार सुरु राहिल्यानं त्यानं ही बाब घरी सांगितली. आणि पालकांनी थेट शाळेत धाव घेतली.
या शिक्षकांविरुद्ध कारवाई होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय या पालकांनी घेतला आहे. काही जागरूक पालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकाराची तक्रार थेट गडचिरोलीच्या शिक्षणअधिकाऱ्यांकडे केली. तर दुसरीकडे शाळेच्या मुख्याध्यापकांनी झाला प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांचही मोठं नुकसान होत आहे. तसच शिक्षकांवर कडक कारवाई कऱण्याची मागणीही आता जोर धरु लागली आहे. दरम्यान या प्रकऱणाची पोलीस तक्रारही करण्याची तयारी प्रशासनाने चालवली आहे.