विद्यार्थ्यांचे कपडेही सोडले नाही शाळेनी...

जळगाव जिल्हा परिषदेत सध्या गणवेश घोटाळा गाजू लागला आहे्. विद्यार्थ्यांसाठीच्या साडेतीन कोटींच्या गणवेश वाटपात गोलमाल झाल्याचं समोर येतं आहे.

Updated: Mar 4, 2012, 06:19 PM IST

www.24taas.com, जळगाव

 

जळगाव जिल्हा परिषदेत सध्या गणवेश घोटाळा गाजू लागला आहे्. विद्यार्थ्यांसाठीच्या साडेतीन कोटींच्या गणवेश वाटपात गोलमाल झाल्याचं समोर येतं आहे. काही ठिकाणी तर अत्यंत निकृष्ट दर्जाचे गणवेश देण्यात आले आहेत.

 

जळगाव जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत गणवेश शिवून घेण्यात आले आहेत. याचं बिल झालं तब्बल ३ कोटी ३५ लाख ३३ हजार १८६ रुपये. नियमानुसार हे गणवेश स्थानिक बचतगटांकडून शिवून घेणं बंधनकारक होतं. मात्र, सरकारच्या नियमांना फाटा देत हे काम जिल्ह्याबाहेर औरंगाबादच्या श्रद्धा महिला विकास मंडळाला का देण्यात आलं असा सवाल विचारला जातो आहे.

 

काही तालुक्यांमध्ये तर अतिशय निकृष्ट दर्जाचं कापड वापरण्यात आलं आहे. त्यामुळं यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे. या सर्व घोटाळ्याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना विचारलं असता, चौकशी करून कारवाई करू, असं थातुरमातुर आश्वासन त्यांनी दिलं आहे. उर्दू शाळांना अपुरं कापड पाठवल्यानं आधीच ही योजना वादात सापडली होती. आता तर सरकारनं दिलेल्या कापडातही फेरफार केल्यानं या संपूर्ण घोटाळ्याची त्वरित चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.