अण्णा हजारे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना आज डिस्चार्ज देण्यात आला. अण्णांनी व्यायाम सुरु केला असून त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती अण्णांवर उपचार करणारे डॉक्टर के.एच.संचेती यांनी दिली आहे

Updated: Jan 8, 2012, 11:33 AM IST

www.24taas.com, मुंबई 

 

पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना आज डिस्चार्ज  देण्यात आला. अण्णांना एक महिन्यांची विश्रींती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अण्णा यांनी पत्रकारांशी संवाद साधला नाही. अण्णांनी व्यायाम सुरु केला असून त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती अण्णांवर उपचार करणारे डॉक्टर के.एच.संचेती यांनी दिली आहे. मात्र महिनाभर विश्रांतीचा सल्लाही यावेळी अण्णांना देण्यात आला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री अण्णांची तब्येत बिघडल्यानं त्यांना पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं..

 

मुंबईत एमएमआरडीए ग्राऊंडवर उपोषणाच्या वेळेसच अण्णांची प्रकृती ढासळली होती आणि त्यामुळे त्यांनी एक दिवस अगोदरच उपोषण सोडलं होतं. त्यानंतर अण्णा हजारे विश्रांतीसाठी राळेगण-सिद्धीला गेले होते. टीम अण्णांची ३१ डिसेंबरची बैठक अण्णांची प्रकृती बिघडल्याने रद्द करण्यात आली होती. अण्णांचे वयोमान आणि दिल्लीतील दीर्घकाळ चाललेल्या उपोषणामुळे प्रतिकार शक्ती कमी झाल्याचं मत डॉक्टर संचेती यांनी व्यक्त केलं होतं. आणि त्यामुळेच भविष्यात अण्णा उपोषण करु शकतील की नाही यावर प्रश्नचिन्हं उभं राहिलं आहे. तसंच अण्णांना छातीतील संसर्गामुळे तातडीने पुण्याला हलवण्यात आलं होतं.