'वहिनीं'नीमुळे 'अजितदादा' अडचणीत येणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार यांनी महार वतनाची जमीन बळकावल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मुळशीचे तहसीलदार आणि कुळकायदा विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवला आहे.

Updated: May 8, 2012, 10:48 AM IST

www.24taas.com, पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार यांनी महार वतनाची जमीन बळकावल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मुळशीचे तहसीलदार आणि कुळकायदा विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवला आहे.

पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात रीहे गावातली जमीन आहे. महार वतनाच्या या जमिनीपैकी काही जमीन अजित पवारांच्या वहिनी शर्मिली पवार यांनी बळकावल्याचा आरोप जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांनी केला होता. या आरोपाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही दुजोरा मिळाला आहे. काही जमिनी विकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश दिला होता, त्यात खाडाखोड करून पवार यांनी दुसरा बनावट आदेश तयार केला.

हा दुसरा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दफ्तरी नाही. त्यामुळे तो जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला नाही. अशी माहिती खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानं अजित पवारांच्या अडचणी वाढणार असल्याचं चित्र दिसतं आहे.