www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई महानगरपालिकांच्या 38 शाळांना मुख्याध्यापकच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या 3 वर्षापासून शाळांमधिल शिक्षकांची पदं देखिल रिक्त आहेत. त्यामुळे पालिका शाळांच्या शिक्षणाचा दर्जेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय तसंच शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणावर टीका केली जातेय.
धनधाडग्यांच्या शाळांमध्ये प्रवेश घेता न येणा-यांना महापालिकेची शाळा..हेच शिक्षणाचं माध्यम..... मात्र हे शिक्षणाचं नुसतंच माध्यम झालंय..... दर्जाच्या बाबतीत पुरती बोंब आहे. मुंबईत अनुदानित 49 माध्यमिक शाळांपैकी 38 शाळांना मुख्याध्यापकच नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. तसंच 15 सहाय्यक मुख्याध्यापक आणि जवळपास 200 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे ही पदं भरण्यासाठी शाळांमध्ये एजंट फिरतायत आणि ते 50 हजार रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप माध्यमिक शिक्षक कर्मचारी सेनेनं केलाय.
38 शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यानं इतर शिक्षकांवर कामाचा ताण येतो. सहाजिकच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होत असल्याची कबुली शिक्षकच देतायत. या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही शिक्षणाधिका-यांकडे गेलो, तर टाळाटाळ करत ते चक्क निघून गेले.
महापालिकेच्या शाळांसाठी बजेटमध्ये तब्बल 2400 कोटी रुपये मंजूर झालेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून शाळांना मुख्याध्यापक नसेल तर एकूणच पालिकेच्या शाळांमध्ये कशाप्रकारे शिक्षण दिलं जात असेल, यावर प्रश्नचिन्हच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.