www.24taas.com, झी मीडिया, लातूर
लातूरच्या औसा तालुक्यातल्या हासेगावमध्ये एका एड्सबाधित विद्यार्थ्याला शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवल्याची घटना उजेडात आलीय. कागदपत्रांची पूर्तता करुनही हा प्रवेश नाकारण्यात आल्यानं ‘आम्ही सेवक’ या संघटनेकडून या विद्यालयावर कारवाईची मागणी होतेय.
एड्सबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आलीय. एड्सबाधितांच्या हक्कांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. सरकारकडून याबाबत प्रबोधन होत असल्याचा डंका वाजवला जातो. मात्र एका एड्सबाधित विद्यार्थ्याला शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवल्याची घटना लातूरच्या हासेगावमध्ये घडलीय.
इथल्या ‘आम्ही सेवक’ या संस्थेमार्फत एचआयव्हीबाधित विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या सेवालयात हा विद्यार्थी दाखल झाला. उदगीरमध्ये १० वीपर्यंत शिक्षणाचा दाखला घेऊन पुढल्या प्रवेशासाठी त्यानं ज्ञानसागर विद्यालयात अर्ज केला. मात्र या विद्यार्थ्याला इथं प्रवेश नाकारण्यात आला. शिक्षणाधिकाऱ्यांना सांगूनही प्रवेश मिळाला नसल्यानं कारवाईची मागणी आम्ही सेवक संघटनेनं केलीय.
याबाबत ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्याध्यापक कालिदास गोरे यांना विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. चार वर्षाआधीही हासेगावच्या शाळांनी अशाचप्रकारे एड्सबाधित विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला होता. त्यावेळी झी मीडियानं लढा देत या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला. मात्र आजही एड्सबाबत जगजागृती होऊनही शिक्षणाचा हक्क नाकारला जाणं याहून मोठी शोकांतिका कोणती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.