अपर्णा देशपांडे (प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई) : आज संध्याकाळी नेहमीप्रमाणे बाबांचा फोन आला. पण तो फोन आज अतिशय दु:खाची बातमी सांगण्यासाठी होता. ज्यांनी आमचं आयुष्य घडवलं... आम्हाला संस्कार दिले ते आमचे सर... योगेश कुलकर्णी... त्यांनी आज या जगाचा निरोप घेतला... अवघ्या चाळीशीतल्या माझ्या सरांचं आज निधन झालं... या फोननंतर काही काळ तर मी सुन्नच झाले आणि जुन्या आठवणींनी टचकन डोळ्यात पाणी आलं.
आमचे शाळेतले ते दिवस... असे डोळ्यासमोरून तरारून गेले... माझी शाळा हिंगणघाटची एस. एस. एम. कन्या विद्यालय... मी सातव्या वर्गात असतांना योगेश सर आमच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. दिसायला अगदी रुबाबदार... सर्व मुली तर त्यांच्यावर फिदा झाल्या... ते अभिनेते महेश कोठारे सारखे दिसायचे...
मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा सर पहिल्यांदा आमच्या वर्गावर आले. आमचा ऑफ पिरेड कुलकर्णी सरांनी घेतला होता. आमच्या सोबत खूप गप्पा मारल्या... गाणे गायिले... आपल्या आयुष्यात मैत्रीचं महत्त्व काय असतं हे त्यांनी आम्हाला सांगितलं... तेव्हाच रिलीज झालेल्या ‘बिनधास्त’ या मराठी चित्रपटाची कथा त्यांनी इतक्या सुंदर शब्दात आम्हाला सांगितली की, तो एक चित्रपट नसून खरोखरच घडलेला प्रसंग असल्यासारखा वाटावं...
आमची बॅच योगेश कुलकर्णी यांच्या करिअरची पहिली बॅच होती. सर आठव्या वर्गात आमचे क्लास टिचर झाले. सलग तीन वर्ष त्यांनी आमच्या वर्गाला खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळलं... आम्हांला घडवलं... ज्या इंग्रजीची भीती सर्वांना असते... ते इंग्रजी किती सोपी आहे... त्या इंग्रजी व्याकरणात कशी गंमत आहे, ती त्यांनी आम्हाला सांगितली. मी आम्ही म्हणतेय कारण माझा पूर्ण वर्ग आम्ही सगळेच योगेश सरांचे फॅन झालो होतो. मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही विषय त्यांनी अतिशय सुरेख पद्धतीनं आम्हाला शिकवले.
कुलकर्णी सर आमचे क्लास टिचर असल्यामुळं साहजिकच त्यांचा पहिला पिरेड असायचा... मूल्यशिक्षणाच्या पिरेडमध्ये सरांनी आम्हाला राम रक्षा, गणपती स्तोत्रासह मराठी भावगीतं, भक्तीगीतंही शिकविले. त्यांचा आवाज खूप गोड होता... आशा भोसले त्यांची आवडती गायिका... आशा भोसलेंचे सर्व मराठी गाणे तर त्यांना तोंडपाठ... मग आपसुकच ती गाणी आम्हालाही पाठ झाली. कधी-कधी अभ्यासाचा कंटाळा आला की, आम्ही सरांना म्हणायचो... ‘सर एक गाणं म्हणा न...’ की मग ते पण आवडीनं गाणं ऐकवायचे... असं असलं तरी अभ्यासाच्या बाबतीत फार शिस्तीचे... त्यांनी दिलेला होमवर्क झालेला नसला... की, झालं... अनेक मुली घाबरायच्या होमवर्क करून आणायच्या आणि त्यातूनच सगळ्यांचं इंग्रजीही सुधारलं...
सरांसोबत गाणं गायचा अनुभव
सरांना जशी गाण्याची आवड तशीच ती मला आणि माझी मैत्रिण सुरूचीला होती. शाळेत शारदा देवी बसायची... मग वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या... आमचं आठवीचं वर्ष... योगेश सरांनी आम्हाला ‘जय शारदे वागेश्वरी’ हे गाणं शिकवलं... मी आणि सुरूची ते छान म्हणायचो... पण आमचा आवाज चढायचा नाही. मग काय सर स्वत: आम्हा दोघींसोबत उभे झाले... शारदा देवीसमोर आम्ही तिघांनी हे गाणं गायलं... ही आठवण आजही सुरूची आणि माझ्यासमोर जशीच्यातशी उभी आहे.
शाळेची पहिली ट्रीप
कुलकर्णी सर खूप उत्साही... शाळेत त्यांनी अभ्यास, खेळीमेळीच्या वातावरणासह सहल किती महत्त्वाची हे सुद्धा दाखवून दिलं.. आणि माझ्या आयुष्यातल्या पहिल्या सहलीला मी गेली ती म्हणजे नवव्या वर्गात अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा, मुक्तागिरी या थंड हवेच्या ठिकाणी... एक बस... ६० मुली आणि ५ शिक्षक अशी ही सहल ही सुद्धा कायम स्मरणात राहणारी आहे... कारण ही फक्त सहल नव्हती तर विविध विषयांची माहिती होती... आणि सहलीवरून आल्यानंतर त्यावर निबंधही लिहायचाच होता... दोन दिवसांची सहल झाली... निबंधही प्रत्येकीनं लिहिला... असे हे माझे लाडके सर आज गेले... अजूनही त्यांच्या जाण्याच्या बातमीवर विश्वास बसत नाहीय.
अवघ्या चाळीशीतले माझे सर आपल्या पश्चात वयस्कर आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुलांना मागे सोडून गेले आहेत. पण ते असे का गेले? आमच्या लाडक्या सरांना व्याधीनं जडलं होतं... त्यांची प्रकृती खालावली... आम्हाला संस्कार देणाऱ्या सरांसोबत असं नव्हतं घडायला पाहिजे... सरांच्या या सर्व आठवणी अखेरपर्यंत सोबत राहतील.
माझ्या लाडक्या कुलकर्णी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.