सिनेमा : जंजीर
दिग्दर्शक : अपूर्व लखिया
कलाकार : राम चरण तेजा, संजय दत्त, प्रियंका चोप्रा, प्रकाश राज, माही गिल
फिल्म रिव्ह्यू : प्राण नसलेला ‘जंजीर’!
www.24taas.com झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडमधील अमिताभ बच्चनची ओळख निर्माण करणाऱ्या जंजीर या चित्रपटाचा रिमेक शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटात वेगळं काही तरी करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी केलाय मात्र हा प्रयत्न सपशेल फसलाय.
जंजीर म्हटलं की अमिताभ बच्चन आणि प्राण यांचा चेहरा आपल्यासमोर येतो... आता आलेल्या ‘जंजीर’ या चित्रपटात सर्व कलाकारांची नावं तर तीच आहेत पण या ‘रिमेक’ चित्रपटाची कथा मात्र पहिल्या जंजीरपेक्षा वेगळी आहे.
काय आहे कथा…
चित्रपटाची कथा एका रागीट सीपी विजय खन्नाची (राम चरण तेजा) आहे. लहानपणी विजयच्या नजरेदेखतच त्याच्या आई-वडिलांची हत्या केली जाते. त्यानंतर तो आपल्या काकाच्या घरी राहतो. त्याचे काका पोलीस अधिकारी असल्यानं तो त्यांच्याकडे राहूनच पोलीस बनतो.
जास्त रागीट असल्याने विजय पोलीस अधिकारी म्हणून जास्त काळ टिकत नाही. मुंबईमध्ये विजयचा सामना शेर खान म्हणजे संजय दत्तसोबत होतो. शेर खान हा एक कार चोरी करणाऱ्या गॅंगला चालवतोय. हा शेर खान काही काळ आपले सर्व गैरकाम थांबवतो आणि विजयसोबत मैत्री करतो.
या दरम्यान एका मर्डर केसच्या संदर्भात विजय हा माला म्हणजे प्रियंका चोप्राला भेटतो. माला ही गुजरातची असून ती आपल्या मैत्रिणीच्या लग्नाच्या निमित्तानं मुंबईमध्ये आलीय. योगायोगानं माला ही त्या मर्डर केसची एकमेव साक्षीदार आहे. मालानंतर विजयला रुद्र प्रताप तेजाचा (प्रकाश राज) तपास लागतो आणि हा तेजा अनेक पेट्रोल पंपचा मालक असून त्याचा मुख्य बिझनेस पेट्रोलमध्ये भेसळ करून विकण्याचा आहे. हा तेजा सतत आपल्या मोना डार्लिंग सोबतच (माही गिल) दिसतो. याचा शोध विजयला शेर खानमुळे लागतो आणि हळूहळू तो आपल्या आई वडिलांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचतो.
अभिनयाची बात...
जंजीरच्या रिमेकमध्ये प्रियंकाचा अभिनय हा खूप चांगला वाटतो. साऊथचा सुपरस्टार राम चरण तेजानं या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलीय. संजय दत्तचे `शूट खोचे पठान की जुबान` हे गाणे अतिशय हीट ठरलंय.
शेवटी काय तर...
‘अँग्री यंग मॅन’ नवीन विजयमध्ये प्रेक्षक शोधत राहतो... पण त्याची निराशा होते. प्रकाश राज यांच्या फनी अॅक्टमुळे हा चित्रपट काही काही ठिकाणी चांगला वाटतो. पूर्ण चित्रपट हा अॅक्शन चित्रपट असल्यासारखा वाटतो. प्रकाश मेहरा यांनी केलेल्या चित्रपटाचा सिमेक बनवण्यात अपूर्व लाखिया पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.