सोनाक्षीच्या कामानं इमरान प्रभावित!

दिग्दर्शक मिलन लुथरियांचा ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता इमरान खान आपली सहअभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या कामानं खूप प्रभावित झालाय. सोनाक्षीचं काम, वेळेचं महत्त्व आणि काम करण्याची पद्धत अतिशय प्रभावित करणारी आहे, असं म्हणणं आहे इमरानचं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 12, 2013, 06:48 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
दिग्दर्शक मिलन लुथरियांचा ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता इमरान खान आपली सहअभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या कामानं खूप प्रभावित झालाय. सोनाक्षीचं काम, वेळेचं महत्त्व आणि काम करण्याची पद्धत अतिशय प्रभावित करणारी आहे, असं म्हणणं आहे इमरानचं.
आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रविवारी सीआयडीच्या सेटवर शूटिंग करण्यासाठी आलेल्या इमारन सोनाक्षीचं भरभरून कौतूक केलं. इमरान म्हणतो, सोनाक्षी सोबत मी पहिल्यांदाच काम केलंय. सोनाक्षी खूप व्यावसायिक आणि प्रतिभावंत अभिनेत्री आहे. ती वेळेच्या बाबतीत अतिशय शिस्तबद्ध आहे. ती सेटवर नेहमीच वेळेच्या आधी पोहोचलेली असते. आपले संवाद आणि दृश्य तिला माहिती असतात, त्यामुळं तिच्यासोबत काम करण्यात अतिशय मजा आली असून तिच्याकडून प्रेरणाही मिळाली, असं इमरान म्हणाला.
सीआयडीमधील लहानग्यांचा लाडका दया म्हणजेच दयानंद शेट्टीही सोनाक्षीचं कौतूक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकला नाही. दया म्हणाला, सोनाक्षीला सेटवर साडेबाराची वेळ दिली होती. ती वेळेच्या अगोदरच म्हणजे सकाळी ११ वाजताच सेटवर हजर होती. यावरुन तिच्या अंगी असलेलं वेळेचं महत्त्व दिसून येतं.

२०१०मध्ये रिलीज झालेला ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’चा ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ हा सिक्वेल आहे. एकता कपूर चित्रपटाची निर्माती असून येत्या शुक्रवारी हा चित्रपट रिलीज होतोय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.