`गूढ` विद्यापिठाची संजीव नाईकांना `डॉक्टरेट`

राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा मुलगा आणि राष्ट्रवादीचे लोकसभेचे ठाण्याचे उमेदवार संजीव नाईक बारावी उत्तीर्ण आहेत.

Updated: Apr 11, 2014, 12:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा मुलगा आणि राष्ट्रवादीचे लोकसभेचे ठाण्याचे उमेदवार संजीव नाईक बारावी उत्तीर्ण आहेत. खुद्द त्यांनीच निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेच्या तक्त्यामध्ये नोंद आहे. मात्र, असं असलं तरीदेखील संजीव नाईक आपल्या नावासमोर `डॉक्टर` ही उपाधी लावताना दिसतात... आता नाईक हे `डॉक्टर` आहेत की `बारावी पास` असा प्रश्न भल्याभल्यांना पडलाय.

सध्याच्या काळात स्वत:च्या नावाआधी डॉक्टर लावण्याची चटक बहूतेकांना लागलेली दिसते. विशेष म्हणजे या मोहापासून राजकरणी व्यक्तीदेखील दूर राहू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर काही नेत्यांना त्यांच्या नावाआधी डॉक्टर लावून स्वत:च्या नावाचं मोठेपण वाढवण्याची हौस लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते डॉ. संजीव नाईक यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला `इंटरनॅशनल तामिळ युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅण्ड, यूएसए` या विद्यापीठाकडून `कॉन्ट्रिब्युशन इन फिल्ड ऑफ प्रिव्हेन्टीव्ह हेल्थ ऑफ बेटर एन्व्हायरन्मेंटट या विषयातल्या दोन वर्ष उत्तम अभ्यासासाठी ही मानद डॉक्टरेट पदवी मिळालीय. विशेष म्हणजे इंटरनेटवर या विद्यापीठाची माहितीच मिळत नाही. पण अशा `गूढ` विद्याविठाने दिलेल्या डॉक्टरेट पदविचा उल्लेख मात्र संजीव नाईक आवर्जून सर्व सार्वजनिक करताना दिसतात.

पण, लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरताना मात्र डॉक्टर नाईकांना आपल्या पदवीचा विसर पडलेला दिसतोय. उमेदवारीचा अर्ज भरताना स्वत:ची ओळख डॉक्टर म्हणून करुन देणाऱ्या नाईकांनी आपण बारावी उत्तीर्ण असल्याचा उल्लेक केलाय. स्वत: संजीव नाईक यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेच्या कॉलममध्ये हीच माहिती दिलीय.
जनतेच्या कामात प्रचंड व्यग्र असताना त्यांनी डॉक्टरेट मिळवल्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करावं तेवढं थोडंच... मग असं असताना का बरं त्यांच्यावर आक्षेप घेतले जातायत? ज्या विद्यापीठातून त्यांना पीएचडी मिळाली ते कुठलं बरं मान्यवर विद्यापीठ...? संजीव नाईक यांना डॉक्टरेट कधी मिळाली? त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन कधी केलं? याबाबत संबंधित सर्टिफिकेट दाखवल्यानं वाद संपेल, मग संजीव नाईक ते का बरं दाखवत नाहीत...? असे अनेक सवाल या निमित्तानं उभे राहिलेत. त्याचं उत्तर संजीव नाईक यांनी देणं गरजेचं आहे. 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.