www.24taas.com, झी मीडीया, नवी दिल्ली
दिल्लीतील अराजक आम आदमी पार्टीला चांगलंच भोवलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रस्त्यावर उतरून केलेलं धरणं आंदोलन आणि स्वतःच कायदा हाती घेण्याचा कायदामंत्री सोमनाथ भारती यांचा खटाटोप आपच्या अंगलट आलाय. गेल्या 17 जानेवारीपासून पक्षाच्या ऑनलाइन देणग्यांमध्ये कमालीची घट झालीय.
आपविरोधातील नाराजीचा हा परिणाम असल्याचं मानलं जातंय.
`आप`च्या लोकप्रियतेला ओहोटी लागलीय
गेल्या 8 डिसेंबरला आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, सर्वत्र आप-आपचा गजर सुरू झाला होता.
अनेक मान्यवरांनी आपमध्ये प्रवेश घेण्यासाठी रीघ लावली होती. मेधा पाटकर यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्या देखील आपचा जप करू लागल्या. परंतु दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यात घडलेल्या घडामोडींमुळे आपच्या लोकप्रियतेला ओहोटी लागलीय.
पोलिसांच्या विरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन केलं. लोकशाहीमध्ये मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीनं घटनात्मक चौकटीत राहून प्रश्न सोडवायचे असतात. त्याऐवजी धरणे आंदोलनासारखा सवंग प्रसिद्धीचा मार्ग केजरीवालांनी स्वीकारल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठली.
बोध घेण्याऐवजी `होय मी अराजक माजवणारा आहे`
केजरीवाल आणि आप अराजकाला आमंत्रण देत असल्याची टीका होऊ लागली. यातून बोध घेण्याऐवजी `होय मी अराजक माजवणारा आहे,` अशी दर्पोक्ती केजरीवालांनी केल्यानं सर्वांनाच धक्का बसला.
आपच्या नेत्यांची ही नौटंकी अनेकांना आवडलेली नाही. त्याचा फटका आपला बसू लागलाय. गेल्या 17 जानेवारीपासून आपच्या तिजोरीत पडणारी देणग्यांची रसद चांगलीच आटलीय.
`आप`ची ऑनलाईन आवक
दिल्ली विधानसभा निवडणुकांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात आपला ऑनलाइन देणग्यांच्या स्वरूपात सुमारे 20 कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला. 28 डिसेंबरला `आप`ने सरकार स्थापन केले, त्यादिवशी पक्षाच्या तिजोरीत 21 लाख रूपयांची भर पडली.
आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे आप अडचणीत
2014 च्या पहिल्या तीन तारखांना 40 लाख रूपयांहून अधिक रक्कम दरदिवशी जमा झाली. मात्र कुमार विश्वास आणि प्रशांत भूषण यांच्यासारख्या नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे आप अडचणीत आला.
त्यातच 17 जानेवारीला कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी नायजेरियन महिलांच्या घरावर बेकायदेशीर धाड टाकल्याची बातमी आली आणि आपच्या देणग्या आटायला सुरूवात झालीय.
त्या दिवसापासून आपच्या तिजोरीत जेमतेम लाख-दीड लाख रूपयेच जमा होतायत. त्यामुळे आपच्या नेते चांगलेच टेन्शनमध्ये आलेत. कारण लवकरच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत.
देशभरात लोकसभेच्या सुमारे 400 जागा लढवण्याचे आपने ठरवलेय. एवढ्या जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी आपला मोठा निधी जमा करावा लागणार आहे. त्यामुळं घटलेली आर्थिक रसद ही आपसाठी निवडणुकीत डोकेदुखी ठरणार आहे.
अराजकाला आमंत्रण देणारा पक्ष
मात्र त्यापेक्षाही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा पक्ष ही आपची ओळख पुसट होत चाललीय. याउलट अराजकाला आमंत्रण देणारा पक्ष म्हणून आप बदनाम होतोय आणि केरसुणीवाल्यांच्या पक्षासाठी ती जास्त चिंताजनक बाब ठरणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.